कोल्हापूर : कुमार साहित्याचा अभाव धोकादायक : लक्ष्मीकांत देशमुख; कुमार कथा जॉयस्टिकचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:56 AM2018-08-27T11:56:31+5:302018-08-27T11:58:50+5:30
आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या अवस्थांतराच्या काळात बाल व प्रौढांसाठीच्या साहित्याची निर्मिती होत आहे; मात्र, कुमार साहित्याचा अभाव आहे; त्यामुळे अवस्थांतराच्या स्थितीत असणाऱ्या पिढीला या साहित्याचा अभाव असणे धोकादायक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर : आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या अवस्थांतराच्या काळात बाल व प्रौढांसाठीच्या साहित्याची निर्मिती होत आहे; मात्र, कुमार साहित्याचा अभाव आहे; त्यामुळे अवस्थांतराच्या स्थितीत असणाऱ्या पिढीला या साहित्याचा अभाव असणे धोकादायक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे माऊस मीडिया प्रकाशित व सोनाली नवांगुळ लिखित ‘जॉयस्टिक’ या कुमारकथांच्या पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
देशमुख म्हणाले, आजच्या बदलत्या विश्वामुळे कुमार वयोगटाच्या कालखंडातील कथा वाचण्यास मिळत नाहीत. या कालखंडातील वयोगटांसाठी लिहिणे म्हणजे आव्हानात्मक काम आहे. आजच्या बालमनाचे वय ५ ते ८ झाले आहे. पूर्वी ५ ते १० होते. त्यात ८ ते १५ हा वयोगट कुमार होता; मात्र आजची परिस्थितीच वेगळी आहे.
बालमने झपाट्याने बदलत आहेत. अशा काळात भावविश्व समजून कुमार गटासाठी ‘जॉयस्टिक’ सारख्या पुस्तकाची निर्मिती होणे ही चांगली माणसे घडविण्याचे काम आहे. अशा प्रकारची निर्मिती आजच्या साहित्यिकांकडून अपेक्षित आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस म्हणाले, सत्त्व टिकवण्यासाठी बालसाहित्याची निर्मिती आवश्यक आहे. कुमारांसाठी लिहिणारे लेखकच नाहीत. जे वय कुमार गटाचे आहे. त्या कालखंडासाठी चांगले लिहिणारे पाहिजेत. हीच बाब लेखिका सोनाली व प्रकाशक अमृता यांनी जाणून ‘जॉयस्टिक ’ची निर्मिती केली आहे.
बदलत्या वर्तनशास्त्रानुसार नव्या मुलांचे मानसशास्त्र जणू या साहित्यातून या दोघींनी अधोरेखित केले आहे. आजची मूलं शहाणी आहेत. त्यांच्या कल्पनाविश्वातील भावना या पुस्तकाच्या रूपातून साकारल्या आहेत. माणसे मोठी झाली, तरी त्यांच्यातील लहानपण जागे असते. केवळ ते व्यक्त होत नाही. असे मनोगत लेखिका नवांगुळ यांनी व्यक्त केले.
यावेळी पत्रकार अजय कांडर यांनीही मनोगत व्यक्त केले. अमृता वाळिंबे यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन मुग्धा गोरे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते.