‘कुंभी’, गडहिंग्लजची रणधुमाळी; ‘राजाराम’ची निवडणूक न्यायालयीन निकालावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 01:28 PM2022-03-31T13:28:39+5:302022-03-31T13:30:42+5:30
चौथ्या, पाचव्या व सहाव्या टप्प्यातील सर्व वर्गांतील संस्थांच्या निवडणुका ३१ जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सहकारी प्राधिकरणाने दिले आहेत.
कोल्हापूर : विकास संस्थांच्या निवडणुका प्राधान्याने घेण्यासाठी प्रलंबित ठेवलेल्या इतर संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया शुक्रवार (दि. १) पासून सुरू होत आहे. चौथ्या, पाचव्या व सहाव्या टप्प्यातील सर्व वर्गांतील संस्थांच्या निवडणुका ३१ जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सहकारी प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार, कुंभी कासारी साखर कारखाना, कोल्हापूर अर्बन बँक, शिक्षक बँक, कोजिमाशि पतसंस्थांची प्रक्रिया सुरू होणार आहे. हे जरी खरे असले, तरी प्रारूप यादी, अंतिम यादी आणि प्रत्यक्षात मतदान होण्यास पावसाळा उजाडणार आहे.
कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. मात्र, ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू झाल्या. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार विकास संस्थांच्या निवडणुका प्राधान्याने घेतल्या जात आहेत. त्यामुळे गेले तीन महिने इतर संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे ठप्प होत्या. मात्र, विकास संस्थांच्या निवडणुका सुरूच राहणार आहेत. त्याचबरोबर, इतर प्रकारातील चौथ्या, पाचव्या, सहाव्या टप्प्यांतील प्रलंबित संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत आहे. या निवडणुका ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.
त्यानुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील चौथ्या, पाचव्या, सहाव्या टप्प्यात प्रलंबित संस्थांंच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ‘कुंभी’ कारखाना, कोल्हापूर अर्बन, शिक्षक बँक, कोजिमाशि पतसंस्थांसह इतर संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
एप्रिल, २०२० पर्यंतचे मतदार पात्र
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीची अर्हता दिनांक १ एप्रिल, २०२२ असून, या मागे दोन वर्षे म्हणजे १ एप्रिल, २०२० पर्यंतची यादी मतदानासाठी पात्र राहणार आहे.
‘राजाराम’ची निवडणूक न्यायालयीन निकालावर
राजाराम कारखाना मतदार यादीचा वाद न्यायालयात आहे. हा कारखाना पहिल्या टप्प्यात आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने तेथील निकालावरच निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.
जिल्ह्यातील निवडणुकीस पात्र संस्था -
- साखर कारखाने - ८ (राजाराम, कुंभी, गडहिंग्लज, सह्याद्री, इंदिरा गांधी, आजरा, भोगावती, गायकवाड)
- नागरी बँका - २१ (कोल्हापूर अर्बन, प्राथमिक शिक्षक आदी)
- ‘ब’ वर्गीय पतसंस्था - ५२ (कोजिमाशि, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी, ग्रामसेवक)
- प्रक्रिया, औद्योगिकसह इतर - ५२०
- ‘पदुम’ - ५५०