कुंभोजचे साडेपाच हजारांवर पशुधन वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:50 AM2020-12-05T04:50:22+5:302020-12-05T04:50:22+5:30
कुंभोज : नवीन भरती नसल्याने येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या सात वर्षांपासून कायमस्वरूपी पशुधन पर्यवेक्षकाची नेमणूक न झाल्याने बहुतांशपणे बंद ...
कुंभोज : नवीन भरती नसल्याने येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या सात वर्षांपासून कायमस्वरूपी पशुधन पर्यवेक्षकाची नेमणूक न झाल्याने बहुतांशपणे बंद स्थितीतील दवाखाना आता केवळ नावालाच उरला आहे. परिणामी कुंभोजसह परिसरातील सुमारे साडेपाच हजार पशुधन सरकारी पशुवैद्यकीय सेवेला पोरके बनले आहे. दवाखाना आठवड्यातून एक दिवस चालू अन् सहा दिवस बंद राहत असल्याने येथील परिसरासही अवकळा आली आहे.
येथे श्रेणी दोनचा पशुवैद्यकीय दवाखाना असून, प्रदीर्घकाळ कायमस्वरूपी पशुधन पर्यवेक्षक नसल्याने आश्वासक सरकारी पशुवैद्यकीय सेवा मिळत नाही. यामुळे पशुपालकांनी दवाखान्याकडे पूर्णपणे पाठ फिरविली असून, खोडा बंद झाला आहे.
सध्या किणी गावासह अन्य चार गावे, तसेच इचलकरंजी कार्यालयाचा कार्यभार असणाऱ्या पशुधन पर्यवेक्षकांची कुंभोजच्या दवाखान्यात तात्पुरती नेमणूक झाली आहे. तथापि ते दोन महिन्यांपासून दीर्घ मुदत रजेवर गेले आहेत. येथील नवनियुक्त परिचरास बाहेरील कामे सोपविल्याने दवाखान्यास कोणीच वाली राहिलेला नाही.
कुंभोजसह, हिंगणगाव, नेज, दुर्गेवाडी परिसरातील सुमारे साडेपाच हजारांहून अधिक पशुधनास नियमित सरकारी पशुवैद्यकीय सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकरवी जनावरांवर उपचार करून घ्यावे लागत आहे. कुंभोजच्या मळेभागात सध्या काही जनावरांना लंपी रोगाची लागण झाल्याने पशुपालक हबकले आहेत. पशुपालकांना खासगी पशुवैद्यकीय सेवेसाठी वर्षानुवर्षे कमालीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी लक्ष देऊन दवाखान्यात जिल्हा परिषदेमार्फत तरी पशुधन पर्यवेक्षक नेमावा, अशी मागणी पशुपालकांमधून जोर धरत आहे.
फोटो ओळी- कुंभोज (ता. हातकणंगले) येथील श्रेणी दोनच्या पशुवैद्यकीय दवाखाना परिसरास अशी अवकळा आली आहे.