कुंभी कारखाना निवडणूक: ..तर राजकारणातून संन्यास घेतो, चंद्रदीप नरके यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 02:29 PM2023-02-09T14:29:33+5:302023-02-09T14:29:57+5:30
माझ्यावर बोलल्याशिवाय खाडेंना पद कसे मिळेल
कोपार्डे : ‘कुंभी’चा सहवीज प्रकल्प तोट्यात असल्याचे विरोधकांनी सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास घेतो. खोटे बोलून सभासदांची दिशाभूल करणाऱ्या खाडेंनी ‘गोकुळ’च्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा, मात्र, त्यांच्याकडून तसे होणार नाही, असा पलटवार ‘कुंभी’चे अध्यक्ष, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केला.
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखाना निवडणूक नरके पॅनेलच्या प्रचारार्थ करवीर तालुक्यातील आडूर, कळंबे, भामटे, चिंचवडे परिसरातील सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पी. डी. देसाई होते.
चंद्रदीप नरके म्हणाले, दरवर्षी सहवीज प्रकल्पाच्या उत्पन्नातून प्रकल्पासासाठी घेतलेले १०८ कोटी कर्जाचे हप्ते व्याजासह भागवून ५९ कोटी रूपये शिल्लक राहिले. या पैशांचा वापर साखरेचे दर घसरले असताना एफआरपी देण्यासाठी उपयोगी पडले. गेल्या पाच वर्षांत कारखान्याला उच्च साखर उतारा व गुणवत्ता असे राज्य राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. ही गुणवत्ता नव्हे काय? यावेळी डॉ. इंद्रजित पाटील, सरदार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
माझ्यावर बोलल्याशिवाय खाडेंना पद कसे मिळेल
विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून माझ्यावर ऊठसूट आरोप करण्याचे षङ्यंत्र बाळासाहेब खाडेंचे आहे. त्यांची तरी काय चूक आहे ? माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना पद कसे मिळेल, असा टोला चंद्रदीप नरके यांनी लगावला.
सभेत हल्ले करणाऱ्यांनी गप्पा मारू नयेत
वार्षिक सभेत आम्ही विरोधकांच्या प्रश्नांची चार तास उत्तरे दिली तरीही समाधान नाही. विरोधक ज्या नेत्याला मानतात त्यांच्या कारखान्याच्या सभेत प्रश्न विचारणाऱ्यांवर थेट व्यासपीठावरून हल्ले केले जातात. अशांना गप्पा मारू नयेत, असा टोला चंद्रदीप नरके यांनी लगावला.