करूंगळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा डेंग्यूने मृत्यू
By admin | Published: April 17, 2016 12:42 AM2016-04-17T00:42:14+5:302016-04-17T00:42:14+5:30
गावात मोठी साथ : आरोग्य प्रशासनाच्या गलथानपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप
आंबा/मलकापूर : करुंगळे येथील ग्रामपंचायत कर्मचारी आकाराम तुकाराम वारंग (वय ५०) यांचा डेंग्यूने शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाला. आरोग्य प्रशासनाच्या गलथानपणाचा हा बळी ठरल्याचा संताप ग्रामस्थ व लोकप्रतिनिधीतून व्यक्त करण्यात आला. मात्र त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
डेंग्यू व अन्य तापाच्या साथीमुळे गेले तीन आठवडे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत एकवीस रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असून, त्यांना शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये दोन बालके, सहा शाळकरी मुले, पाच पुरुष व आठ महिलांचा समावेश आहे. बाधित असणाऱ्यांची नावे : सुवर्णा पांडुरंग वारंग (वय ४०), मंदा अरुण कांबळे (२५), प्रगती संजय वारंग (२५), सविता केशव वारंग (३०), मानूबाई यशवंत कदम (६२), वंदना कृष्णा कदम (४५), राजश्री रविंद्र घाटगे (३५), वैशाली केरबा वारंग (२८), साहील रविंद्र चाळके (२२), तानाजी नामदेव वारंग (२७), लक्ष्मण शंकर वारंग (४०), केशव आण्णा वारंग (३५), संजय शामराव वारंग (३२), पूनम लक्ष्मण वारंग (२५), असंतोष अरुण कांबळे (१४), स्वप्नील प्रकाश पाटील (१३), रवी पांडुरंग वारंग (१२), करण शिवाजी वारंग (८), साहील केशव वारंग (७), सोहम केशव वारंग (५), स्वरा संजय वारंग (३).
याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. वृत्तानंतर परळेनिनाईचे आरोग्य पथक कार्यरत होते. तरीही वस्तीत डेंग्यूची साथ राहिली. आतापर्यंत पंधरा रुग्ण उपचार करून घरी परतले. एकवीसजणांवर उपचार चालू आहेत. शनिवारी आकाराम वारंग या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने तालुका अधिकारी, आमदार, जिल्हा परिषद सदस्यांनी धाव घेऊन येथील साथीवर धोरणात्मक उपाय व प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे आदेश आमदार सत्यजित पाटील यांनी दुपारी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत दिले. यामध्ये तहसीलदार ऋषीकेत शेळके व गटविकास अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्याचे तीस जणांचे पथक स्थापन करून, उद्याचा ड्राय डे गावात राबवून सर्व घरांतील पाण्याची भांडी मोकळी करून, कोरडी केली जातील. सांडपाण्याचे साठे मुजवून डास निर्मुलनाची मोहीम होईल. प्रत्यक्ष कुटुंबाची भेट घेऊन सर्व्हे होईल, असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, बैठक घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरवण्यात आले.
घरात सोडल्यानंतर मृत्यू
आकाराम वारंग या कर्मचाऱ्याला चार दिवसांपासून ताप येत होता. शनिवारी दिवसभर आकारामने गावच्या योजनेचे पाणी गावाला सोडले आणि सायंकाळी त्यांचा ताप वाढल्याने सहा वाजता उपचारास दवाखान्यात गेले. चार तासांच्या उपचार दरम्यान त्यांना उलट्या झाल्या. ते गंभीर झाल्याने त्यांना आरोग्य पथकाने रात्री साडेदहाला घरी सोडले आणि तासाभरात त्यांचा मृत्यू झाला.
सीपीआरमधील बेदखल...
गावातून सीपीआरमध्ये गेलेल्या डेंग्यू तापाच्या रुग्णांना अपघात विभागात बसा, नंतर बघू अशी वागणूक दिली जात असल्याने अनेक रुग्ण खासगी दवाखान्याकडे वळल्याचे नांदगावकर यांनी सांगून आतापर्यंत तीन लाखापर्यंत खर्च रुग्णांना झाल्याचे बैठकीत स्पष्ट केले. आमदारांनी फोन केल्यानंतर रुग्णाला सीपीआरचा उपचार मिळत नसेल, तर सामान्यांचे काय हाल राहतील, अशी पोटतिडीक आनंद वारंग यांनी मांडली.