‘भाजप’मध्ये गेल्या की कुपेकर वहिनी पडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:50 AM2018-04-28T00:50:44+5:302018-04-28T00:50:44+5:30
कोल्हापूर : ‘भाजपमध्ये गेल्या की कुपेकर वहिनी पडल्या म्हणून समजा,’ अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना इशारा दिला. पाणीटंचाईच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. यावेळी पालकमंत्री पाटील हे अवाक् झाले; तर कुपेकर वहिनी अस्वस्थ झाल्या. जरी सर्वांनीच हा प्रकार हसण्यावारी नेला असला तरी जाता-जाता मुश्रीफ यांनी ही एक प्रकारची ‘तराटणी’च दिल्याचे मानले जाते.
पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाईबाबतची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत पाणी प्रकल्पांबाबतचा मुद्दा सातत्याने मुश्रीफ यांनी मांडल्याने मंत्री पाटील यांनी त्यांना याबाबत बैठकीनंतर चर्चा करूया असे सांगितले. त्यामुळे बैठक झाल्यानंतर व्यासपीठावर आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार मुश्रीफ हे पालकमंत्री पाटील यांच्या शेजारी बसले. पाणी प्रकल्पांबाबत यावेळी मुश्रीफ आणि पाटील यांच्यात दहा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर मुश्रीफ जाण्यासाठी निघाले.
‘अहो मुश्रीफ, आपण एकत्र पत्रकार परिषद घेऊया’ असे पालकमंत्री सांगत असतानाच मुश्रीफ निघण्यासाठी उठले आणि कुपेकर वहिनी उठून पालकमंत्र्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसल्या. यावेळी दादांना मुश्रीफांचा चिमटा काढण्याचा मोह आवरला नाही. ‘अहो, वहिनी आमच्याकडे आल्या!’ असा टोला पालकमंत्र्यांनी लगावला आणि त्याक्षणी मुश्रीफांनी, ‘त्या तुमच्याकडे (भाजपकडे) आल्या की पडल्या म्हणून समजा,’ असे स्पष्टपणे सांगितले आणि ते हसत-हसत सभागृहाबाहेर पडले. मुश्रीफांच्या या रोखठोक टोल्यामुळे सर्वांवरच अवाक् होण्याची वेळ आली; तर तोंडावर हात ठेवत कुपेकर वहिनीही अस्वस्थ झाल्या. ‘यांच्या जिभेवर काळा डाग आहे का?’ अशी विचारणा मंत्री पाटील करीपर्यंत मुश्रीफ सभागृहाबाहेर पडले होते. त्यामुळे बैठकीनंतर सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मुश्रीफांच्या या भविष्यवाणीचीच चर्चा होती.
कुपेकर वहिनी, मुलगी मिळून काम करतात
बैठकीमध्ये दोन वेळा आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आपल्या भागातील पाणीटंचाईबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर पालकमंत्री पाटील यांनी ‘कुपेकर वहिनी आणि मुलगी अशा दोघी काम करीत असल्याने त्यांचे प्रश्न संपत नाहीत. हो की नाही मुश्रीफ?’ अशी टिप्पणी केली होती.
भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळेच टोला
आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे विविध कामांसाठी निधी मागितल्यानंतर तो मंजूर करण्यात येतो. चंदगड तालुक्यातील पर्यटनविषयक कामांनाही पालकमंत्र्यांनी तातडीने निधी लावला आहे. या पार्श्वभूमीवर कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदा बाभूळकर या ‘नागपूरकर’ असल्याने या दोघी भाजपमध्ये प्रवेश करणार, या चर्चेने मध्यंतरी जोर धरला होता. या चर्चेमुळेच वेळ बघून मुश्रीफ यांनी हा भीमटोला लगावल्याची चर्चा यावेळी होती.