कुपवाडला विमा रुग्णालयास टाळे

By admin | Published: April 29, 2015 11:30 PM2015-04-29T23:30:02+5:302015-04-30T00:24:52+5:30

प्रशासनाचा हलगर्जीपणा : पाच वर्षांचे भाडे थकल्याने आली नामुष्की

Kupwad avoids the insurance hospital | कुपवाडला विमा रुग्णालयास टाळे

कुपवाडला विमा रुग्णालयास टाळे

Next

कुपवाड : शहरातील राज्य कामगार विमा योजनेचे (ईएसआय) रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सोळा दिवस बंद आहे. खोलीभाडे थकल्यामुळे आणि जागा हवी असल्यामुळे खोलीमालकाने रुग्णालयाला कुलूप ठोकल्याची चर्चा असून, याप्रकरणी मालकाने रुग्णालयाच्या प्रशासनाला न्यायालयीन नोटीसही बजावली असल्याचे समजते. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे एमआयडीसीतील शेकडो कामगारांची गैरसोय झाली आहे. त्यातच भरीस भर म्हणून राज्य कामगार विमा योजना विभागाने हे बंद असलेले रुग्णालय मिरजेला वर्ग करण्याचे आदेश देऊन कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे.
कुपवाड एमआयडीसी, मिरज एमआयडीसी आणि वसंतदादा औद्योगिक वसाहत आदी तिन्ही औद्योगिक वसाहतींच्या मध्यभागी कुपवाड शहर आहे. त्यामुळे या तिन्ही औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना कुपवाडमधील राज्य कामगार विमा योजना विभागाचे हे रुग्णालय सोयीचे होते.
गेली अनेक वर्षे हे रुग्णालय शहरात सुरू होते. परंतु, २००८ पासून राज्य कामगार विमा योजनेकडील प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे खोलीमालकाचे लाखो रुपयांचे भाडे थकले आहे. मालकाला ही जागा हवी आहे. खोलीमालकाने रुग्णालय प्रशासनाला वेळोवेळी कळवूनही या प्रश्नाकडे त्यांनी डोळेझाक केली असल्याची चर्चा आहे.
प्रशासनाने दुसरीकडे जागा भाड्याने घेणे गरजेचे होते; परंतु तसे न करता सोळा दिवस रुग्णालय बंद पाडण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे तिन्ही औद्योगिक वसाहतींमधील कामगारांची गैरसोय झाली आहे. त्यांना सांगली किंवा मिरजेला हेलपाटे घालावे लागत आहेत.
काहीजण सांगली सिव्हिललाही जात आहेत. सध्याच्या उन्हाळ्याच्या आणि औद्योगिक मंदीच्या दिवसात कामगारांचे हाल होत आहेत. भरीस भर म्हणून राज्य कामगार विभागाने हे रुग्णालय मिरजेला वर्ग करण्याचे आदेश दिले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
औद्योगिक वसाहतींच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे रुग्णालय राज्य कामगार विभाग प्रशासनाने त्वरित सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. (वार्ताहर)

उद्योजकांचा आंदोलनाचा इशारा
कुपवाड आणि मिरज एमआयडीसीमधील शेकडो कामगारांना कुपवाड शहरामधील रुग्णालयामधून सेवा मिळत होती. त्यांना सांगली किंवा मिरजेला हेलपाटे घालणे गैरसोयीचे होते. त्यामुळे हे रुग्णालय कुपवाड किंवा एमआयडीसीमध्ये सुरू असावे. ते मिरज किंवा सांगली शहरात हलवू नये. अन्यथा राज्य कामगार विमा योजना विभागाविरोधात कामगारांना घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कुपवाड आणि मिरज एमआयडीसीमधील उद्योजकांनी दिला आहे.

Web Title: Kupwad avoids the insurance hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.