कुरुंदवाडमध्ये इच्छुकांना पालिका निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:15 AM2021-07-05T04:15:59+5:302021-07-05T04:15:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कुरुंदवाड : शहराला पालिका निवडणुकीचे वेध लागले असून, सामाजिक कार्यकर्त्यांच्या संख्येला उधाण आले आहे. वाढदिवस, वृक्षारोपण, ...

In Kurundwad, aspirants are watching the municipal elections | कुरुंदवाडमध्ये इच्छुकांना पालिका निवडणुकीचे वेध

कुरुंदवाडमध्ये इच्छुकांना पालिका निवडणुकीचे वेध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कुरुंदवाड : शहराला पालिका निवडणुकीचे वेध लागले असून, सामाजिक कार्यकर्त्यांच्या संख्येला उधाण आले आहे. वाढदिवस, वृक्षारोपण, कोरोना योद्ध्यांचा सत्कार, गरीब, गरजूंना मदतीचा हात देण्याचे निमित्त करुन स्वयंघोषित समाजसेवक प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. शर्यतीपूर्वी धावणारे इच्छुक निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत किती टिकतात, हे निश्चित नसले तरी यानिमित्ताने मतदारांची चंगळ होत आहे. त्यामुळे शहरवासीयांची करमणूक तर नेत्यांना कार्यकर्त्यांच्या चाचपणीला संधी मिळत आहे.

वर्षअखेरीस पालिकेची मुदत संपत असल्याने निवडणुका आहेत. त्यामुळे भागाभागातील कार्यकर्त्यांना निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत. राजकीय गटनेत्यांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. काहींना तयारीला लागा, असे आदेशही मिळाले आहेत. मात्र, इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नेत्यांनी उमेदवारीसाठी आपली दखल घ्यावी, यासाठी इच्छुक प्रभागात वेगवेगळे उपक्रम राबवून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नेत्यांना आपली ताकद दाखवण्याचा आणि मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

वाढदिवस, कोरोनाच्या निमित्ताने गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे, प्रभागातील समस्या पालिका प्रशासनापुढे मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे, जेवणावळी देत प्रभागाचा जणू ‘कैवारी मीच आहे’ असे भासविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे.

इच्छुकांच्या उधळपट्टीत तरुणाई धुंद होत असली तरी अद्याप निवडणूक प्रक्रियाही सुरु नाही. त्यामुळे शर्यतीपूर्वीच पळण्यास सुरुवात झाल्याने निवडणुकीपर्यंत किती इच्छुक टिकतात, हे सांगता येत नाही. मात्र, इच्छुकांच्या इर्षेमुळे मतदारांची चंगळ सुरु असून, गटनेते मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेवत कार्यकर्त्यांचा अंदाज घेत आहेत.

--

चौकट - अनेकांकडून तिखट प्रतिक्रिया

निवडणुकीपूर्वी समाजसेवकाचा आव आणणारे निवडून आल्यानंतर पालिकेच्या टक्केवारीत अधिक रस दाखवतात. त्यामुळे चांगला कार्यकर्ता आहे. निवडून आला की सर्वसामान्यांची, प्रभागाची कामे करेल, यावर विश्वास नाही हा अनुभव आहे, अशी अनेकांनी सत्य मात्र तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली.

Web Title: In Kurundwad, aspirants are watching the municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.