कुरुंदवाड शहर ७५ टक्के पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:10+5:302021-07-26T04:23:10+5:30
दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढच होत आहे. त्यामुळे शहरातील ७५ टक्के ...
दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढच होत आहे. त्यामुळे शहरातील ७५ टक्के भाग पाण्याखाली गेला असून शहराला बेटाचे स्वरूप आले आहे. पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, रेस्क्यू फोर्सचे जवान कार्यरत झाले आहेत.
शहरातील माळभाग, नगरपालिका चौक, राजवाडा चौक वगळता शहराला पाण्याने व्यापले आहे. पोलीस ठाण्यात पुराचे पाणी शिरले आहे. संभाव्य धोका ओळखून बहुतेक नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. शहरातून बाहेर पडण्याचा मजरेवाडी हा एकमेव मार्ग शिल्लक होता. मात्र, या मार्गावर चौगुले पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर कृष्णेचे पाणी आल्याने शहरातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला आहे त्यामुळे बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मुख्याधिकारी निखिल जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, उपनिरीक्षक अमित पाटील हे शहरातील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
पाऊस थांबला असला तरी अद्याप धिम्यागतीने पाणीपातळीत वाढच होत असल्याने नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे.
फोटो - कुरुंदवाड मुख्याधिकारी निखिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील शहरातील पाण्यातून फिरत पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
2) शहरातील भालचंद्र थिएटर चौकाला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे.