कुरुंदवाड पालिकेकडून करवसुलीची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:26 AM2021-02-24T04:26:32+5:302021-02-24T04:26:32+5:30
कुरुंदवाड : पालिका प्रशासनाने करवसुली मोहीम तीव्र केली आहे. वसुलीला दाद न देणाऱ्या दुकानदार, व्यावसायिक, शासकीय कार्यालये सील करण्यात ...
कुरुंदवाड : पालिका प्रशासनाने करवसुली मोहीम तीव्र केली आहे. वसुलीला दाद न देणाऱ्या दुकानदार, व्यावसायिक, शासकीय कार्यालये सील करण्यात येत असून शहरातील मजरेवाडी रस्त्याला असलेल्या ‘महावितरण’चे मुख्य कार्यालय करवसुली पथकाने सील केले. त्यामुळे वसुलीची थकबाकीदारांनी धास्ती घेतली असून कर भरण्यासाठी मिळकतधारकांनी पालिकेत गर्दी केली आहे.
आर्थिक वर्षाअखेर जवळ आल्याने पालिका प्रशासन करवसुली मोहीम तीव्र केली आहे. प्रलंयकारी महापूर, कोरोना या नैसर्गिक आपत्तींमुळे गेली दोन वर्षे करवसुली थकीत पडली आहे. उत्पन्न थकल्याने शहराच्या विकासकामाला तसेच पालिका कर्मचाऱ्यांच्या पगाराला काहीअंशी ‘ब्रेक’ मिळाला होता. कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याने त्याचा परिणाम करवसुलीवर होऊ नये यासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी वसुली मोहीम गतिमान केली आहे. विभागवार पथक तयार करण्यात आले असून वसुली न देणाऱ्या मिळकतधारकांवर कारवाई करण्याचे तसेच व्यावसायिक, शासकीय कार्यालये सील करण्याचे आदेश मुख्याधिकारी जाधव यांनी पथकाला दिल्याने वीसहून अधिक दुकाने सील करण्यात आली आहेत. विद्युत महापारेषण कार्यालयाचे १ लाख १२ हजार रुपये कर थकीत असल्याने करवसुली पथकाने हे कार्यालय सील केले आहे. या कारवाईमुळे मिळकतधारकांनी चांगलीच धास्ती घेतली असून फेब्रुवारीमध्ये करवसुली पन्नास टक्क्यांवर गेली आहे. मार्च अखेर किमान नव्वद टक्के करवसुली करण्याचा मानस मुख्याधिकारी जाधव यांनी व्यक्त केला आहे. करवसुली पथकात करनिरीक्षक प्राची पाटील, अजित दीपंकर, नंदकुमार चौधरी, शशिकांत कडाळे, निशिकांत ढाले, अमोल कांबळे, बापू हेगडे, राजू वावरे, रोहित ढाले, सतीश कांबळे, सौरभ कोठावळे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
फोटो - २३०२२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - कुरुंदवाड शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेले विद्युत महापारेषण कार्यालय पालिकेच्या करवसुली पथकाकडून सील करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव, करनिरीक्षक प्राची पाटील उपस्थित होत्या.