कुरुंदवाड तबक उद्यानाला तळ्याचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:26+5:302021-07-10T04:17:26+5:30
कुरुंदवाड : शहरातील तबक उद्यानात पावसाचे पाणी साचून राहिल्याने पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. शिवाय कचरा आणि गवत उगविल्याने डासांच्या ...
कुरुंदवाड : शहरातील तबक उद्यानात पावसाचे पाणी साचून राहिल्याने पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. शिवाय कचरा आणि गवत उगविल्याने डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनले असून पालिका प्रशासनाने तबक उद्यानातील पाणी काढून स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शहरातील मध्यवस्तीत पालिकेने तबक उद्यानात कोट्यवधी रुपये खर्च करून क्रीडा मैदान आणि प्रेक्षक गॅलरी बांधली आहे. मुळातच तळ्याचे ठिकाण असल्याने मैदान करताना मैदानातील पाणी सायपन पद्धतीने काढता यावे यासाठी लाखो रुपये खर्च करून भुयारी गटार बांधण्यात आले होते. मात्र पालिकेचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.
चांगले मैदान, स्टेज, व्यायामासाठी, खेळाडूंसाठी स्वतंत्र खोल्या, रात्रीच्या स्पर्धांसाठी हायमास्ट दिवे, प्रेक्षक गॅलरी यामुळे या मैदानात मुख्यता कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलच्या विभागीय, राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले जाते. शिवाय स्थानिक क्रिकेट स्पर्धा, विविध सार्वजनिक कार्यक्रम या उद्यानात घेतले जातात.
यंदा एप्रिलपासून वादळी पावसाने झोडपून काढत असल्याने तबक उद्यानातील पाणी आटलेच नाही. त्यामुळे खेळाच्या मैदानाला तळ्याचे स्वरूप आले असून गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली आहे. पाण्यामुळे मैदानात हिरवळ उगवली असून डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांमुळे शहरात डेंग्यू रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींनी तबक उद्यानातील पाणी काढून स्वच्छता करावी, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
फोटो - ०९०७२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - कुरुंदवाड शहरातील तबक उद्यानात पावसाचे पाणी साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.