शुद्धजल प्रकल्पामुळे कुरुंदवाडकरांना दिलासा

By admin | Published: October 30, 2015 10:41 PM2015-10-30T22:41:12+5:302015-10-30T23:26:36+5:30

अनिरुद्ध मोरे यांची सामाजिक बांधीलकी : उल्हास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण उत्साहात

Kurundwadkar relief due to clean water project | शुद्धजल प्रकल्पामुळे कुरुंदवाडकरांना दिलासा

शुद्धजल प्रकल्पामुळे कुरुंदवाडकरांना दिलासा

Next

कुरुंदवाड : शहरातील स्वच्छतेबरोबर आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पाणीही तितकेच महत्त्वाचे आहे. पंचगंगा प्रदूषित नदीकाठावर असलेल्या या शहरात शुद्ध पाण्याची वानवा आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधीलकी म्हणून अनिरुद्ध मोरे यांनी शहरवासीयांसाठी शुद्ध पेयजल प्रकल्प उभारल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.२५ हजार लोकवस्ती असलेल्या शहराला पंचगंगा, कृष्णा नदीने वेढा घातला आहे. शहरासाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केला जातो. या नदीतील पाणी चांगले असले तरी प्रदूषित झालेल्या पंचगंगेचे पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याने पाणी उपसा केला जाणाऱ्या ठिकाणीच पाणी दूषित असते. पालिकेच्यावतीने पाणी शुद्ध केल्या जाणाऱ्या जुन्या तंत्रानुसारच शुद्धिकरण करून शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणी पूर्णपणे प्रदूषित असल्याने म्हणावे तितके पाणी शुद्ध होत नाही. परिणामी, नागरिकांना अशुद्ध पाण्याचा सामना करावा लागत आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी राजकीय गट-तट विसरून शहर स्वच्छतेसाठी कंबर कसली आहे. शौचालययुक्त व प्लास्टिकमुक्त धोरण कडकपणे राबविल्याने शहर स्वच्छतेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या शहराला पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
स्वच्छतेबरोबर आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पाणी हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पंचगंगा नदी प्रदूषित झाल्याने प्रदूषित पट्ट्यातील टाकवडे,
नांदणी, अब्दुललाट, बस्तवाड, औरवाड, आदी गावांनी ग्रामस्थांसाठी ना नफा, ना तोटा या धर्तीवर सेवा संस्था, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून शुद्ध पेयजल प्रकल्प राबवून स्वावलंबनातून शुद्ध पाण्याचा प्रश्न सोडविला आहे.
कुरुंदवाड शहराला दूषित कृष्णा व पंचगंगा नदीचा विळखा पडला आहे. नगरपालिकेने शुद्ध पेयजल प्रकल्प उभारण्याचा सहा महिन्यांपूर्वीच पालिका सभेत ठराव करण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी झालीच नाही. अनिरुद्ध मोरे हे शिक्षक असून, त्यांनी सामाजिक बांधीलकी म्हणून स्वखर्चाने सुमारे सात लाख रुपये खर्चून शुद्ध पेयजल प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचे नुकतेच आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार असल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Kurundwadkar relief due to clean water project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.