कुरुंदवाडच्या एस. के. पाटील बँकेत अपहार : सतरा कोटींचा गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:29 AM2018-08-30T00:29:44+5:302018-08-30T00:30:18+5:30

Kurundwad's S. K. Nashik: Theft in the bank: Rs | कुरुंदवाडच्या एस. के. पाटील बँकेत अपहार : सतरा कोटींचा गैरव्यवहार

कुरुंदवाडच्या एस. के. पाटील बँकेत अपहार : सतरा कोटींचा गैरव्यवहार

Next
ठळक मुद्देव्यवस्थापकासह २३ संचालकांविरुद्ध गुन्हा; आजी-माजी नगराध्यक्षांचा समावेश

कुरुंदवाड : येथील एस. के. पाटील सहकारी बँकेच्या १७ कोटी ३१ लाख आठ हजार रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकासह २३ संचालकांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. नगराध्यक्ष जयराम पाटील, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, कोल्हापूरचे माजी महापौर बंडोपंत नायकवडी या प्रमुखांचा यामध्ये समावेश आहे. यापैकी बंडोपंत नायकवडी यांचे निधन झाले आहे. याबाबत सनदी लेखापाल उमेश गोगटे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, संचालकांत खळबळ उडाली आहे. सहकारात अग्रेसर असणाऱ्या शिरोळ तालुक्यात संचालक मंडळाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.

‘कृष्णा-पंचगंगा तीरावरील अस्सल खणखणीत नाणं’, असे ब्रीदवाक्य घेऊन सहकारात वाटचाल करणाºया एस. के. पाटील बँकेचे चालक व संचालकांच्या मनमानी कारभारामुळे २००८ साली बँक बंद पडली. त्यामुळे या बँकेवर जयसिंगपूर सहकारी संस्था सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली. बँक बंद पडल्याने ठेवीदारांच्या एक लाखापर्यंतच्या ठेवी इन्शुरन्स कंपनीने परत केल्या. मात्र, येथील जयप्रकाश पतसंस्थेचे ३.५ कोटी व रत्नदीप पतसंस्थेची ५ कोटी रुपयांची ठेव परत न मिळाल्याने संस्थेच्यावतीनेअ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
अवसायकांनी संचालकांच्या मालमत्तेचा जप्ती आदेश काढला होता.

मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे संस्थेच्यावतीने याचिकाकर्ते अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने न्यायालयाने अवसायकाच्या कामकाजावर ताशेरे ओढत संचालकांच्या मालमत्तेची विक्री करून नुकसानीची रक्कम वसूल करण्याचा कालबद्ध तपशील न्यायालयात सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे या कारवाईला गती मिळाली होती.
सनदी लेखापाल गोगटे यांनी संचालकांविरुद्ध २ आॅगस्टला कुरुंदवाड पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची जिल्हा पोलीसप्रमुख, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने शहानिशा करून बुधवारी गुन्हा नोंद केला.

२००१ ते ३१ मार्च २००७ या कालावधीत संचालकांनी नियमबाह्य अपात्र संस्था व व्यक्ती यांना कर्ज देऊन स्वत:चा आर्थिक फायदा घेत ठेवीदारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या कारवाईने संचालकांचे धाबे दणाणले असून, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याने खळबळ उडाली आहे.

संचालकांची नावे अशी
बँकेचे अध्यक्ष संजय शामराव पाटील, संचालक - जयराम कृष्णराव पाटील (नगराध्यक्ष), रघुनाथ एम. पाटील, रामचंद्र भाऊ डांगे (विद्यमान नगरसेवक व माजी नगराध्यक्ष), कोल्हापूरचे माजी महापौर बंडोपंत व्ही. नायकवडी, रामचंद्र डी. मोहिते, रामदास एन. जगताप, बाबूराव तुकाराम पाटील, रघुनाथ नाना पाटील, विजया यशवंत पाटील, सर्जेराव गणपती पाटील, बाबासो दिनकर कांबळे, शकुंतला एस. पाटील, लता डी. पाटील, प्रतापसिंग एस. देसाई, शामराव के. पाटील, चंद्रकांत एम. पाटील, पांडुरंग बाबूराव पाटील, आण्णासो बळवंत पाटील, सुरेश दशरथ पाटील, गोपाळ शिवराम शिपूरकर, मारुती आर. तिवटे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज तुकाराम मांजरेकर, अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे असून, यातील चार संचालकांचे निधन झाले आहे.

उद्याच्या सुनावणीकडे लक्ष
बँकेच्या अपहाराच्या रकमेची वसुली पुढील सहा महिन्यांत कशी करणार, याबद्दल एका आठवड्यात हमीपत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने अवसायकाला दिले आहेत. याबाबतची सुनावणी उद्या, शुक्रवारी असून, अवसायक कोणते हमीपत्र सादर करतात व न्यायालय यावर काय भूमिका घेते, याकडे संचालकांसह तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

मोबाईल बंद
गुन्हा दाखल होताच सर्वच संचालक गायब झाले आहेत. अपहाराचा आकडा मोठा असल्याने कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याने संचालकांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वच संचालक अज्ञातवासात असल्याने त्यांचे मोबाईल नॉट रिचेबल लागत होते.

नगराध्यक्षांना धक्का
नगराध्यक्ष जयराम पाटील संचालक असून, गुन्हा नोंद होताच उपनगराध्यक्ष अक्षय आलासे यांच्याकडे पदभार देऊन ते गायब झाले आहेत. अनिश्चित काळासाठी हा पदभार असून, नगराध्यक्ष पाटील यांना पोलीस कारवाईचा धक्का, तर आलासे यांना प्रभारी नगराध्यक्षपदाचा सुखद धक्का मिळाला आहे.

Web Title: Kurundwad's S. K. Nashik: Theft in the bank: Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.