कुरुंदवाडची ‘सुपर गर्ल’ निकिता कमलाकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:46 AM2019-01-29T00:46:07+5:302019-01-29T00:46:12+5:30
गणपती कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क कुरुंदवाड : क्रीडा क्षेत्रात यश मिळविण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती महत्त्वाची असते. अशा प्रतिकूल ...
गणपती कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : क्रीडा क्षेत्रात यश मिळविण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती महत्त्वाची असते. अशा प्रतिकूल परिस्थितीवरही मात करीत तेरवाड (ता. शिरोळ) येथील निकिता सुनील कमलाकर हिने पुणे येथे झालेल्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये १७ वर्षांखालील वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. अपयशाचे खापर परिस्थितीवर फोडणाऱ्या खेळाडूंनी ‘सुपर गर्ल’ निकिताचा आदर्श घेण्यासारखाच आहे.
निकिता ही कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत आहे. ती तेरवाड येथील बेघर वसाहतीत राहण्यास असून, वडील सुनील अपंग असूनही संसाराचा गाडा चालविण्यासाठी शेतमजुरी करतात; तर आई शिरोळच्या दत्त साखर कारखान्यातील आरोग्य केंद्रात सेविका आहे. मिळणाºया तुटपुंज्या पगारावर घरचा चरितार्थ चालवितानाही मुलीच्या वाट्याला हलाखीचे जीवन येऊ नये, तिने शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
निकितानेही या परिस्थितीचे भान ठेवून वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करण्याचा ध्यास घेतला आहे. ती येथील हर्क्युलस जिममध्ये जिद्दीने सराव करीत आहे. तिची जिद्द, त्यासाठी ती देत असलेला वेळ, कष्ट ओळखून हर्क्युलस जिमचे प्रमुख प्रदीप पाटील यांनी निकिताला प्रोत्साहन दिले. वेटलिफ्टिंगमध्ये तालुका, जिल्हा व राज्यस्तरांवर विविध पदके मिळविल्याने पुणे येथे नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मधील वेटलिफ्टिंगसाठी १७ वर्षांखालील वयोगटात राज्याच्या संघातून तिची निवड झाली होती. यात तिने ४६ किलो वजनीगटात निकिताने ५२ किलो क्लीन आणि ७१ किलो जर्क, असे १२३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. बुद्ध्यांक असेल तर अभ्यासातून यश मिळविण्यासाठी घरच्या प्रतिकूल परिस्थितीचा फारसा परिणाम होत नाही. मात्र, क्रीडाक्षेत्रात यश मिळविण्यासाठी शरीरयष्टी बलदंड करण्यासाठी खुराक महत्त्वाचा असतो. त्यासाठी आर्थिक परिस्थिती महत्त्वाची असते. निकिताच्या आई-वडिलांनी मात्र मुलगी म्हणून नाक न मुरडता तिच्या जिद्दीला साथ देत परिस्थितीची उणीव भासू न देता पोटाला चिमटा घेत तिला वेळ व खुराक पुरवीत आहेत. याची जाणीव ठेवून निकिताने सुवर्णपदकाची कमाई करीत आई-वडील व शिक्षकांचे प्रयत्न फळास नेले आहे. तिच्या या यशासाठी हर्क्युलस जिमचे प्रदीप पाटील, प्रशिक्षक विजय माळी, विश्वनाथ माळी, रवींद्र चव्हाण, साने गुरुजी विद्यालयाचे संस्थापक रावसाहेब पाटील, मुख्याध्यापक रोहिणी निर्मळे यांनी प्रोत्साहन दिले आहे.
आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी व प्रशिक्षकांच्या प्रोत्साहनाच्या बळावर मला आॅलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमधून देशासाठी सुवर्णपदक मिळवायचे आहे. हेच माझे अंतिम ध्येय आहे.
- निकिता कमलाकर,
तेरवाड.