‘देवस्थानला लॅबची घाई, भाड्यापोटी ९ लाखांचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:27 AM2021-09-05T04:27:28+5:302021-09-05T04:27:28+5:30

कोल्हापूर : न्याय व विधी खात्याची परवानगी मिळण्याआधीच पॅथाॅलॉजी लॅब सुरू करण्याच्या आततायी निर्णयाचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला ...

‘Lab rush to Devasthan, Rs 9 lakh for rent | ‘देवस्थानला लॅबची घाई, भाड्यापोटी ९ लाखांचा भुर्दंड

‘देवस्थानला लॅबची घाई, भाड्यापोटी ९ लाखांचा भुर्दंड

Next

कोल्हापूर : न्याय व विधी खात्याची परवानगी मिळण्याआधीच पॅथाॅलॉजी लॅब सुरू करण्याच्या आततायी निर्णयाचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला दोन वर्षांपासून तब्बल ९ लाखांहून अधिक रकमेचा फटका बसला आहे. लॅबसाठी घेतलेल्या जागेपोटी समितीने ४५ लाख रुपये अनामत दिली आहे. दर महिन्याला ८० हजार (जीएसटीसह) रुपये भाडे वापराविना भरले जात आहे. समितीने तीन वर्षांचा भाडेकरार केला आहे. आता समितीच बरखास्त झाल्याने याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची गरज आहे.

भाविकांना सेवासुविधा नाहीत याकडे दुर्लक्ष करत गरिबांच्या आरोग्य तपासण्या कमी दरात व्हाव्यात यासाठी पॅथाॅलॉजी लॅब सुरू करण्याचा घाट घातला गेला. शहरात अनेक सेवाभावी संस्थांच्या लॅब सुरू आहेत. तुम्ही हा निर्णय घेऊ नका असे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. त्याकडे काणाडोळा करत न्याय व विधी खात्याच्या परवानगीची वाटही न पाहता २०१९ मध्ये गायन समाज देवल क्लबची इमारत समितीने भाड्याने घेतली. आम्हाला परवानगी मिळाली की इमारत विकत घेऊ, असा शब्दही तत्कालीन अध्यक्ष महेश जाधव यांनी संस्थेच्या विश्वस्तांना देऊन टाकला. आता तर समितीच बरखास्त झाली, कारभाऱ्यांची चौकशी लागली आहे. गेली पावणेदाेन वर्षे ही इमारत वापराविना आहे. आपली ऐपत असो वा नसो भाविकाने मोठ्या श्रद्धेने अंबाबाईला वाहिलेला एक एक रुपयाही मोजून मापून वापरला पाहिजे. इथे मात्र स्वत:च्या खिशातून पैसे जात नाहीत ना, मग फिकीर कशाला, अशी मानसिकता बनली आहे. त्यातूनच तब्बल दोन वर्षे लॅब तरी सुरू नाही आणि भाडे मात्र दिले जात आहे.

---

परवानगी नाहीच..

न्याय व विधी खात्याने देवस्थान समितीस पॅथॉलॉजी लॅब सुरू करता येणार नाही, त्यावर पैसे खर्च करू नयेत, असे स्पष्टपणे कळविले आहे. हे कळल्यानंतर तरी भाडेकरार रद्द करायला हवा होता; परंतु तो आजअखेर सुरू आहे.

वाईटातील चांगली बाब

गायन समाज देवल क्लब ही कोल्हापूरच्या कलापरंपरेचे मानाचे पान आहे. या संस्थेला व्यावसायिक संस्थांकडून अधिक रकमेचे भाडे मिळतानाही त्यांनी फक्त देवस्थान व चांगले काम आहे म्हणून कमी भाडे आकारले. अनामत मात्र ४५ लाख रुपये देण्यात आले. देवस्थान समितीच्या तिजोरीतून ही रक्कम जात असली तरी देवल क्लबसारख्या संस्थेला ती मिळाली एवढीच त्यातली चांगली बाब.

-----

पैशाचा पाण्यासारखा वापर

देवस्थानचा कारभार फक्त अंबाबाई मंदिराच्या उत्पन्नावर चालतो. अन्य मंदिरातून उत्पन्न शून्य आहे. अशात गेली दीड वर्षे मंदिर बंद आहे. कोट्यवधीचे उत्पन्न लाखावर आले आहे. आधी कार्यालयाचे नूतनीकरण, जमिनीची मोजणी, महापूर आणि कोरोनाचे निमित्त दाखवत पाण्यासारखा पैसा खर्च केला. कोरोना काळात जिल्हा प्रशासनाला दिलेला निधीच तेवढा काय तो सत्कारणी लागला असेल. बाकी पैशांचा हिशेब हा स्वतंत्र चौकशीचा विषय आहे. परंतु त्यात जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधीही लक्ष घालायला तयार नाहीत.

----

Web Title: ‘Lab rush to Devasthan, Rs 9 lakh for rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.