Kolhapur Crime: कामावरून पळून गेल्याच्या रागातून मजुराचा खून, दोन महिन्यांनंतर झाला खुनाचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:09 IST2025-03-20T16:08:56+5:302025-03-20T16:09:21+5:30

पन्हाळ्यातील कणेरीच्या जंगलात सापडला होता मृतदेह

Laborer murdered in anger over escape in Kolhapur murder solved after two months | Kolhapur Crime: कामावरून पळून गेल्याच्या रागातून मजुराचा खून, दोन महिन्यांनंतर झाला खुनाचा उलगडा

Kolhapur Crime: कामावरून पळून गेल्याच्या रागातून मजुराचा खून, दोन महिन्यांनंतर झाला खुनाचा उलगडा

आसुर्ले-पोर्ले : काम दिल्यानंतर कामावरून पळून गेल्याच्या रागातून मजुराला परत आणून कोल्हापूर बसस्थानकावर दोघांनी मारहाण केली. या मारहाणीत प्रशांत पांडुरंग कसबले (वय ३५, रा. देसाईवाडी, ता. चंदगड) या मजुराचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर चौघा जणांनी मजुराच्या मृतदेहाची विल्हेवाट पन्हाळा तालुक्यातील कणेरीच्या जंगलात लावली. दोन महिन्यांपूर्वी सडलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाच्या खिशात असणाऱ्या चिठ्ठीवरून पन्हाळा पोलिसांनी खुनाचा उलघडा केला. 

पन्हाळा पोलिसांनी चारही आरोपींना मंगळवारी (दि. १९) ताब्यात घेऊन अटक केली आहे. सागर धुळप्पा बंडगर (वय ३८ वर्षे, मातंग गल्ली, रा. खेबवडे, ता. करवीर), शुभम खानू मेटकर (वय २४, रा. महेपैकी जरगवाडी, ता. करवीर), कृष्णात शिंगाप्या धनगर (वय ४६), गोरख शिंगप्पा धनगर (वय ५२, दोघे जण, रा. धनगर गल्ली, ता. करवीर) अशी आरोपींची नावे आहेत.

२२ जानेवारी रोजी पन्हाळा पोलिसांना कणेरीच्या जंगलात अर्धवट सडलेल्या स्थितीत अनोळखी मृतदेह आढळला होता. मृतदेहाच्या खिशात मोबाइल नंबर असलेली चिठ्ठी सापडली होती. यावरून मोबाइल दुकानामध्ये मृत व्यक्तीचा मोबाइल दुरुस्तीला टाकल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, कसबले यांनी दुकानदाराच्या मोबाइलवरून त्याच्या मित्रास फोन केला होता. याबाबत प्रशांत यांच्या मित्राकडे पोलिस समीर मुल्ला यांनी चौकशी केली असता ते गावातून कामासाठी कोल्हापूरला गेल्याचे समजले.

कोल्हापूर बसस्थानकावर बाहेरून मजुरीस येणाऱ्यांबाबत चौकशी केली असता मजूर पुरविणाऱ्या सागर बनगरची माहिती पोलिसांना मिळाली. शिवाय, कसबले यांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण खेबवडे दाखवत होते. आरोपी सागरकडे कसबले यांच्याबाबत चौकशी केली असता बकरी राखण्याचे काम देतो, असे सांगून कसबलेंना सागरने खेबवडेला नेले होते. तीन दिवस गावात ठेवले. त्यानंतर तीन दिवस महे येथील आरोपी शुभम मेटकर याच्याकडे कामाला ठेवले होते. तेथे त्रास झाल्याने पळून जाणाऱ्या कसबलेंना शुभमने बसस्थानकावरून परत आणले. पळून गेल्याच्या रागातून शुभमने लाकडी दांडका व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर खेबवडे येथे नेऊन कसबले यांना पुन्हा सागर आणि शुभमने दांडक्यांनी मारहाण केली.
सागर आणि शुभमने कसबले यांना जखमी अवस्थेत आडूर (ता. करवीर) येथील गोरख आणि कृष्णात धनगर यांच्याकडे कामाला पाठविले. जखमी अवस्थेत असलेले कसबले यांचा मृत्यू उपचार न केल्यामुळे झाला. ही गोष्ट सागरला सांगितल्यावर त्यांनी हात वर केले.

प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून आरोपी कृष्णात गोरख धनगर यांनी परस्पर मृतदेहाची कणेरीच्या जंगलात विल्हेवाट लावली असल्याची कबुली दिली. पोलिस अधीक्षक आप्पासाहेब पोवार, पोलिस निरीक्षक संजय बोंबले, पोलिस निरीक्षक महेश कोंडुभैरी, पोलिस हवालदार समीर मुल्ला, पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष वायदंडे, रवींद्र कांबळे यांनी तपास केला.

Web Title: Laborer murdered in anger over escape in Kolhapur murder solved after two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.