पोलीस वसाहत अंधारातच, सुविधांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 12:55 PM2022-01-10T12:55:04+5:302022-01-10T12:55:27+5:30
रहिवाशांना रात्री-अपरात्री बॅटरी घेऊन फिरावे लागते. त्यामुळे महिला व मुलींना रात्री घराबाहेर पडताना भीती वाटते.
दीपक जाधव
कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस मुख्यालयाचा परिसर आणि वसाहतीत प्राथमिक सोई-सुविधांची वानवा आहे. पोलीस वसाहतीमध्ये फेरफटका मारला तर तेथील अस्वच्छता व वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेला शिवाजी महाराजांचा पुतळाही अंधारात असल्याचे दिसते.
पोलीस वसाहतीत गटर्स, स्वच्छता, रस्ते व रस्त्यावरील दिव्यांची दुरवस्था झालेली आहे. वसाहतीत दहा बाय दहाची दोन खोल्यांची अगदीच जुनी, कौलारू घरे आहेत. स्वयंपाकघर आणि एका बैठ्या खोलीसह छोटेसे बाथरूम अशी त्यांची रचना आहे. या वसाहतीच्या परिसरात सध्या अंधाराचे साम्राज्य असून, पथदिवे कायम बंद असतात. येथील रहिवाशांना रात्री-अपरात्री बॅटरी घेऊन फिरावे लागते. त्यामुळे महिला व मुलींना रात्री घराबाहेर पडताना भीती वाटते.
काही ठिकाणी गटर्स तुंबलेली असून पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. त्यातच पाण्याच्या हौदाजवळ पाईपलाईन फुटलेली आहे. रस्त्यावर येणारे पाणी हे गटारातील आहे की फुटलेल्या पाईपलाईनमधील, हे गेली कित्येक वर्ष समजलेले नाही. पालिकेच्या अमृत योजनेतून जलवाहिनी टाकण्यात आली; मात्र त्या रस्त्याचे पॅचवर्क केलेले नाही.
राज्य सरकारने जिल्ह्यातील पोलिसांसाठी १४०० निवासस्थाने मंजूर केली. प्रत्येक कर्मचाऱ्याला चार खोल्यांचे घर असे नियोजित असून २९ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर केला असून, काही ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे.
मुख्यालयात येणारे सर्व रस्ते बंद
पोलीस वसाहतीत येण्यासाठी सात ते आठ ठिकाणी रस्ते होते. मात्र मुख्यालयासमोरील एकच रस्ता सुरू ठेवून सर्व रस्ते बंद केले आहेत. त्या ठिकाणी तंबू मारून २४ तास दोन पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहेत. मात्र तेथेही अंधार असल्याने ते जीव मुठीत घेऊन रात्रीचा पहारा देत असतात. याच प्रवेशद्वारातून ये-जा असल्याने मोठी वाहने बाहेर काढताना गर्दीच्या वेळी पुढे-मागे करावी लागतात. शिवाय याच प्रवेशद्वारावर एक शाळाही आहे. शाळा भरताना व सुटताना गर्दी होते. त्यामुळे मोटार परिवहन विभागाकडील हा रस्ता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी लक्ष घालून सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
पोलीस वसाहतीमधील काही ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे; तर जिथे लाईट नाहीत, अशा ठिकाणचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला आहे. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक