कर्जमाफीचा जिल्हा बँकेला झटका
By admin | Published: July 4, 2017 01:28 AM2017-07-04T01:28:07+5:302017-07-04T01:28:07+5:30
कर्जमाफीचा जिल्हा बँकेला झटका
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेली सहा महिने कर्जमाफीचे नगारे साऱ्या राज्यात वाजल्याने त्याचा थेट झटका जिल्हा बँकेच्या वसुलीला बसला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल १३७ कोटींची वसुलीत घट झाली असून ३० जूनअखेर कशीबशी ८० टक्के वसुलीच बँकेला करता आली आहे. त्यामुळे आगामी काळात बँकेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्णाचा विचार केल्यास डिसेंबरपासून विकास संस्थांच्या पातळीवर पीककर्जाची वसुलीस सुरुवात होते; पण या कालावधीतच कर्जमाफीच्या चर्चेने वेग घेतला आणि मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे ऐन वसुलीच्या काळात विकास संस्था व बँकेसमोरील अडचणी वाढत गेल्या आहेत. जूनअखेर शंभर टक्के वसुली करणाऱ्या विकास संस्थांची संख्याही काही कमी नाही. शेतकरी इकडून-तिकडून पैसे गोळा करून ३० जूनला कर्जाची परतफेड करतात. कर्ज खाते नवे झाली की पुन्हा कर्जाची उचल करतात; पण राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्याने परतफेडीचा वेग मंदावला. शेवटपर्यंत कालमर्यादेचा घोळ सुरू राहिल्याने शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेत परतफेडीकडे पाठ फिरविली.
जिल्हा बँकेचे यावर्षी मध्यम मुदत व पीक कर्जाची १४०९ कोटी १७ लाखांची वसूल पात्र रक्कम होती. त्यापैकी ११२३ कोटी ८१ लाख रुपये वसूल झाले म्हणजे केवळ ७९ टक्के वसुली झाली आहे.