वाढत्या विस्तारामुळे सोयी-सुविधांचा अभाव

By admin | Published: October 1, 2015 12:01 AM2015-10-01T00:01:27+5:302015-10-01T00:39:59+5:30

तारदाळमधील अवस्था : सुविधा पुरविणे ग्रामपंचायतीला अशक्य; लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक

Lack of facilities due to increasing expansion | वाढत्या विस्तारामुळे सोयी-सुविधांचा अभाव

वाढत्या विस्तारामुळे सोयी-सुविधांचा अभाव

Next

घन:शाम कुंभार -- यड्राव -इचलकरंजी व परिसरातील उद्योग वाढीसाठी जागा उपलब्ध असणारे गाव म्हणून तारदाळ गावची ओळख आहे. तारदाळ गावाचा विस्तार उपनगरांच्या विस्तारामुळे दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे ग्रामपंचायतीस सेवा-सुविधा पुरविणे गैरसोयीचे बनत आहे. त्यातच प्राईड इंडिया या वस्त्रोद्योग संघटित प्रकल्प उभारणीने ग्रामपंचायतीच्या अर्थकारणास बळकटी निर्माण झाली आहे.गावामध्ये सांडपाणी निर्गतीची सोय नसल्याने आरोग्याच्या समस्या, सार्वजनिक शौचालयांअभावी महिलांची कुंचबणा, पथदिव्यांअभावी अंधार, गावांतर्गत रस्त्याची डागडुजी नाही. मळे भागात पाणंद रस्त्यांचे खडीकरण, मुरुमीकरण, डांबरीकरण नाही. यामुळे मळे भागातील ग्रामस्थांसमोर वाहतुकीची समस्या आहे. पाणंद रस्त्यावर असणाऱ्या नाल्यामुळे पावसाळ्यात रहदारी बंद असते. आरोग्य उपकेंद्रामध्ये आरोग्य अधिकारी नाहीत. समर्थनगर, जी.के.नगर, रामनगर, आझादनगर, श्रीकृष्णनगर, गौरीशंकरनगर या भागात पिण्याचे पाणी, रस्ते व स्वच्छतेचा अभाव आहे.
सुमारे सोळा हजार लोकसंख्या असलेल्या गावात प्राईड इंडियासारखे संघटित वस्त्रोद्योग प्रकल्प उभारणी झाले आहे. याठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध नाही, तर उद्योजकांना कूपनलिका खोदण्यास बंदी आहे. सायझिंगचे सांडपाणी शुद्धिकरणाअभावी उघड्यावर सोडण्यात येते. यामुळे पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गावातून चौगुले मळा संगमनगरकडून पार्वती वसाहतीकडे जाणारा पाणंद रस्ता कमी अंतराचा आहे. तो खडीकरण व डांबरीकरण व्हावा. भारत निर्माण योजनेवरील चोरीला जाणाऱ्या व्हॉल्व्हच्या संरक्षणासाठी योजना आखावी. वाढीव भागात शुद्ध पाणीपुरवठ्याचे नियोजन हवे. पाणंद रस्त्यावर सौरदिवे लावावेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन व्हावे. गावातून हातकणंगलेकडे जाणाऱ्या मार्गावर पॅचवर्क करावे. महिलांसाठी सार्वजनिक शौचालये बांधावीत व सांडपाणी व्यवस्थापन असावे.
प्राईड इंडियामध्ये पाणी आवश्यकतेनुसार उद्योजकांना पुरवठा व्हावा. सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक व्हावी. जलशुद्धिकरण प्रकल्प उभारावा. उद्योजकांनी एकजूट करून संयुक्तपणे खरेदी-विक्री स्वतंत्रपणे करावी. कामगारांसाठी संयुक्तपणे निवारा सोय व्हावी. प्रकल्पामधील कामगारांना शासकीय सेवा योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत. इ.एस.आय. योजना कामगारांना लागू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पाण्याच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पामार्फत कूपनलिका खोदल्यास पाणीप्रश्नाचे निवारण होईल. तारदाळसह प्राईड इंडिया प्रकल्पापर्यंत येणे-जाणेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन व्हावे. या मार्गे एसटी बसेसची वाहतूक कशी फायदेशीर ठरेल, याचे नियोजन करून अंमलबजावणी झाल्यास ग्रामस्थांसह परिसरातील कामगार वर्गास कमी दरात प्रवास उपलब्ध होईल.

Web Title: Lack of facilities due to increasing expansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.