स्वच्छतेचा अभाव, डासांचा प्रादुर्भाव
By admin | Published: April 15, 2015 11:50 PM2015-04-15T23:50:05+5:302015-04-16T00:00:59+5:30
सम्राट नगर, मालती अपार्टमेंट परिसर : कचराकुंड्या भरलेल्या, ‘केएमटी’चेदुर्लक्ष; काही भागात रस्त्यांची दुरवस्था
इंदुमती गणेश/सचिन भोसले - कोल्हापूर शहरातील मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय नागरिकांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सम्राट नगर येथील मालती अपार्टमेंट परिसरात गटारींची अस्वच्छता, कचऱ्याच्या उठावाचा अभाव, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव अशा समस्या भेडसावत आहेत. शिवाय परिसरात ‘केएमटी’ची पुरेशी सोय नाही... या सर्व प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी ‘लोकमत’पुढे व्यक्त केली.
‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी बुधवारी मालती अपार्टमेंट परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी रहिवाशांनी मोकळेपणाने आपल्या समस्या मांडल्या व त्यांच्या सोडवणुकीची अपेक्षा व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकास झालेल्या आणि टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या या परिसरात गटारी तुंबण्याचा मोठा प्रश्न आहे. मुख्य रस्त्यालगत मोठमोठ्या गटारी करण्यात आल्या आहेत. मात्र, तेथे कचरा साठत असल्याने गटारी वारंवार तुंबतात; त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव आहे.
परिसरात एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. त्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त असून, ते परिसरातून हटविण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. कचरा उठाव वेळेवर होत नाही, घंटागाडी येत नाही; त्यामुळे कचराकुंड्या भरून वाहतात; पण वारंवार सांगूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. रस्त्यांची झाडलोट होत नाही; पण याकडे सफाई कामगार गांभीर्याने कधीच पाहत नाहीत, असे एका नागरिकाने सांगितले. भागात काही ठिकाणी पाण्याची वानवा आहे. शिवाय गढूळ पाणी येत असल्याने ते पिण्यायोग्य नसते, अशी व्यथा एका महिलेने मांडली. नागरिकांना प्रवास करण्यासाठी केएमटी बसेस वाढविण्यात याव्यात, अशी मागणी आहे. भागात रस्त्यांची कामे बऱ्यापैकी झाली आहेत. काही ठिकाणी मात्र अजून काम बाकी आहे. परिसरातील उद्यान विकसित होणे गरजेचे आहे.
पावसाचे पाणी थेट घरात
गटारी व्यवस्थित न बांधल्यामुळे मोठ्या पावसात पाणी रस्त्यावरून थेट घरांत शिरते. त्याचबरोबर गटारी वेळोवेळी साफ न केल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
- सुजाता पाटील, पायमल वसाहत
बसच्या फेऱ्या वाढवा
के.एम.टी. प्रशासन दोन तासांनी या परिसरातून बस देत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. याचबरोबर रस्त्यावरील ड्रेनेजचे पाणी पावसाळ्यात संपूर्ण रस्त्यावर येते.
- दीपक पाटील, जागृतीनगर
रस्ते व्यवस्थित नाहीत
पायमल वसाहत, सम्राटनगरकडे जाणारे अंतर्गत रस्ते अजूनही खराब अवस्थेत आहेत. त्यामुळे धड चालतही जाता येत नाही. गटारी वेळेवर स्वच्छ न केल्याने त्या तुंबण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.
- दिगंबर कुलकर्णी, प्रतिभानगर,
निधीची कमतरता
पायमल वसाहत, मालती अपार्टमेंट परिसरात महापालिकेच्या अर्थसंकल्पामधून निधीच कमी आल्याने अनेक कामे अपुरी राहिली आहेत. येत्या काही दिवसांत अपुरा निधी जर मिळाला तर अपुऱ्या कामांना न्याय देता येईल.
- राजू हुंबे, नगरसेवक
मोकाट जनावरांचा त्रास
परिसरात मोकाट श्वानांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. .
- उज्ज्वला मिस्किन, राधाकृष्ण संकुल
परिसरातून बसेस सोडा
शिवाजी विद्यापीठाकडे जाणाऱ्या बसेस कमी सोडण्यात येत आहेत. त्यामुळे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असूनही नागरिकांना तासन्तास बसची वाट पाहावी लागते. - राजाराम पाटील,
कचरा उठाव करा
जागृतीनगरातील कचरा उठाव वेळोवेळी केला जात नाही. त्यामुळे परिसरात सायंकाळी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. महापालिकेने डास प्रतिबंधक औषधे फवारणी केली पाहिजे.
- राजश्री पाटील, पायमल वसाहत
रस्ता व्हावा
गायत्री एंटरप्राईज ते पद्मालय बंगला या मार्गावरील रस्ता गेली कित्येक वर्षे केलेला नाही. त्यामुळे हा रस्ता नव्याने होणे गरजेचा आहे.
- केसरीमल ओसवाल, प्रतिभानगर
सफाई कामगारांची वानवा
अनेकदा सफाई कर्मचाऱ्यांना सांगूनही ते या भागातील कचरा उठाव करीत नाहीत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
- पारस जाधव, सम्राटनगर
नालेसफाई व्हावी
मालती अपार्टमेंटसमोरील नालेसफार्ई वेळेवर होत नाही. त्यामुळे सायंकाळी डासांचेच साम्राज्य असते. पाणीपुरवठाही वेळेवर होत नाही.
- मधुकर चौगुले
स्वच्छतागृह अन्यत्र हलवा
पायमल वसाहतीमध्ये असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाचा परिसरातील नागरिकांना दुर्गंधीमुळे त्रास होत आहे. तरी ही स्वच्छतागृहे नवीन तरी बांधावीत अन्यथा तेथून हलवावीत.
- सोनम भादवणकर
पुलाचे बांधकाम निकृष्ट
मालती अपार्टमेंट रोडवरून शिवाजी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या पुलाच्या कॉँक्रीटमधील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत.
- रफिक मुल्ला