नांदणी आरोग्य केंद्रात नियोजनाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:25 AM2021-03-16T04:25:34+5:302021-03-16T04:25:34+5:30
घन:शाम कुंभार : यड्राव नांदणी (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सात गावांच्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण सुरू आहे; ...
घन:शाम कुंभार : यड्राव
नांदणी (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सात गावांच्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण सुरू आहे; परंतु आरोग्य केंद्राच्या निष्काळजीमुळे व नियोजनाच्या अभावामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
नांदणी आरोग्य केंद्रांतर्गत नांदणी, हरोली, जांभळी, टाकवडे , शिरढोण, धरणगुत्ती, यड्राव या गावांचा समावेश होतो. सध्या कोविड लसीकरण सुरू आहे. याकरिता साठ वर्षांवरील सर्वांना व पन्नास वर्षांवरील व्याधीग्रस्त असणाऱ्यांना लसीकरण सुरू आहे. याकरिता ऑनलाइन नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे.
ऑनलाइन नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना नांदणी आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. याकरिता सर्व गावातून ज्येष्ठ नागरिक येत आहेत. त्यांना आरोग्य केंद्रांमध्ये बसण्याची व प्रतीक्षा करण्यासाठी स्वतंत्र खोली नसल्याने उन्हातान्हात ताटकळत बसावे लागत आहे. लसीकरणाची येथे पुन्हा नोंदणी करण्यासाठी संगणकाजवळ गर्दी होत असल्याने तेथील कर्मचारी गोंधळत आहेत. तर लसीकरण खोलीत लस घेतल्यानंतर बसण्यासाठी दोन खाटाची व्यवस्था केली असून, त्या खोलीमध्ये पंखे नसल्याने उकाड्याचा त्रास होत आहे, तर शुद्ध पिण्याचे पाणीही उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.
याठिकाणी ३ मार्चपासून लसीकरण सुरू झाले असून, आतापर्यंत ६०० ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे. शासनाने लसीकरण राबविण्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे, परंतु येथील केंद्राकडून त्याची योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याने या आरोग्य केंद्रात येणाऱ्या सात गावच्या ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचे योग्य नियोजन झाल्यास सर्वांना सुयोग्य लसीकरण होईल.
कोट - आरोग्य केंद्रातील खोली अंगणवाडीच्या ताब्यात असल्याने ज्येष्ठ नागरिकांना बाहेर ताटकळत थांबावे लागते. लसीकरण केंद्रातील फॅन दोन दिवसात सुरू होतील व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेत आहोत.
- डॉ. व्ही. आर. पाटील
फोटो - १५०३२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - नांदणी आरोग्य केंद्रात लसीकरण करून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत बसावे लागते. तर लसीकरण खोलीमध्ये पंखा नसल्याने लस घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना उकाड्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. (छाया-घन:शाम कुंभार, यड्राव)