पदांच्या लाचारांनी आंबेडकरी मंचावरील अधिकार गमावला

By admin | Published: April 4, 2016 12:59 AM2016-04-04T00:59:15+5:302016-04-04T00:59:15+5:30

भारत पाटणकर यांची नामोल्लेख टाळून रामदास आठवलेंवर टीका

Lack of positions lost the rights of the Ambedkar Manch | पदांच्या लाचारांनी आंबेडकरी मंचावरील अधिकार गमावला

पदांच्या लाचारांनी आंबेडकरी मंचावरील अधिकार गमावला

Next

कोल्हापूर : समाजातील जातिव्यवस्था कायम राहावी असा प्रयत्न करणाऱ्यांशी संगत करत मंत्रिपद, महामंडळ अध्यक्ष या पदांसाठी लाचार झालेल्यांनी आंबेडकरी विचाराच्या व्यासपीठावर बसण्याचा अधिकार गमावला आहे, अशी टीका रामदास आठवले यांचा नामोल्लेख टाळून श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी रविवारी केली.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ क्रियाशील कार्यकर्ते व नेते अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम झाला.
डॉ. पाटणकर म्हणाले, रोहित वेमुलाची विनागोळीची हत्या करणारी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. घटनेत बदल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. वंदे मातरम् व राष्ट्रगीतासंबंधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेते जाणीवपूर्वक वाद निर्माण करत आहेत. भांडवलशाही व जातीयवादी यांचे संबंध घट्ट झाले आहेत. अशावेळी घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चळवळ व्यापकपणे गतिमान करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १५ एप्रिलला सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांतील आंबेडकरी विचारांच्या लोकांचा मेळावा भरवूया. या मेळाव्यात डॉ. आंबेडकर यांनी सांगितलेल्या मुक्तीचा एल्गार करूया.
गुरव म्हणाले, कोणाही शहाणी व्यक्ती अस्वस्थ होईल, असे वातावरण आहे. म्हणून आता डॉ. आंबेडकर यांच्या विचाराचे पारायण होणे गरजेचे आहे.
सडोलीकर म्हणाले, शालेय जीवनापासूनच डॉ. आंबेडकरी विचाराचा प्रभाव पडला. त्यातून चळवळीत सक्रिय झालो. वकिली करत समाजाच्यासाठी रस्त्यावरील लढाई लढत आहे.
यावेळी अ‍ॅड. सडोलीकर, पत्नी भारती, आई हिराबाई, वडील तुकाराम यांचा सन्मानचिन्ह, चळवळीतील पुस्तके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अरुण कडाळे, जानबा कांबळे, कुमार दाभाडे, मलाप्पा कांबळे, नामदेव कांबळे यांचाही सत्कार झाला. डॉ. ज. रा. दाभोळे यांनी स्वागत केले.
अनिल म्हमाणे, नंदकुमार गोंधळी, अस्मिता दिघे यांची भाषणे झाली. कडोली व कसबा आळते वाचनालयास पुस्तके देण्यात आली. ‘महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. सुनील पाटील, संदीप संकपाळ, मच्छिंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन, तर मैत्रेयी कमल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
भागवत यांच्याशी वैर नाही
वैऱ्याने वैर संपवता येत नाही. अवैऱ्यानेच संपवणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, भैया जोशी यांच्याशी आमचे वैर नाही. ते आमच्याकडे वैरत्वाने पाहत असतील, पण आम्ही अहिंसेचे राज्य निर्माण व्हावे, यासाठी विहार करत आहोत, असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

Web Title: Lack of positions lost the rights of the Ambedkar Manch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.