रेमडेसिवीरची टंचाई, मंत्र्यांना फोन करण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:24 AM2021-04-11T04:24:23+5:302021-04-11T04:24:23+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या रुग्णांसाठी आवश्यक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील रुग्णांचे नातेवाईक हवालदिल ...
कोल्हापूर : कोरोनाच्या रुग्णांसाठी आवश्यक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. एका एका इंजेक्शनसाठी थेट अनेकजण मंत्र्यांना फोन करीत आहेत.
सध्या जिल्ह्यात या इंजेक्शनचा तुटवडा आहे. शासकीय रुग्णालयांमध्येदेखील ही इंजेक्शन्स सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात देखील दिवसभरामध्ये ही इंजेक्शन्स उपलब्ध नव्हती. अनेक शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमधून या इंजेक्शन्सची मागणी होत असून ती आणून कुठून द्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात खासगी औषध विक्रेत्यांकडे शुक्रवारपर्यंत २५० इंजेक्शन्स उपलब्ध होती. परंतु ती देखील संपत आली आहेत. या इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार औषध निरीक्षक सपना घुणकीकर आणि मनोज आय्या यांनी शुक्रवारी केमिस्ट असोसिएशनची बैठक घेऊन ही इंजेक्शन्स जिल्ह्याबाहेर देऊ नका अशा सूचना दिल्या आहेत.
चौकट
जिल्हा परिषदेची आठवण
जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन गेल्या वर्षी जिल्ह्यातील आवश्यक असलेल्या सर्व कोरोनाग्रस्तांसाठी साडे पाच कोटी रुपयांची रेमडेसिवीर इंजेक्शन्स खरेदी करून वितरित केली होती. सध्या या इंजेक्शन्सची टंचाई भासत असताना अनेकांना जिल्हा परिषदेची आठवण आली.