पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:28 AM2021-09-08T04:28:59+5:302021-09-08T04:28:59+5:30
गणपती कोळी कुरुंदवाड : महापुरात पंचगंगा काठावरील शेती उद्ध्वस्त झाली. पूर ओसरून दीड महिना होत आला तरी महावितरण कंपनीचे ...
गणपती कोळी
कुरुंदवाड : महापुरात पंचगंगा काठावरील शेती उद्ध्वस्त झाली. पूर ओसरून दीड महिना होत आला तरी महावितरण कंपनीचे अद्याप विद्युतपुरवठा सुरू न केल्याने पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे महापुरात पावसाने तर कसेबसे वाचलेली पिके पाण्याअभावी माना टाकत असल्याने तालुक्यातील पंचगंगा काठच्या शेतकऱ्यांची अवस्था ‘देवाने दिले अन् भुताने नेले’ अशीच झाली आहे. त्यामुळे शेतीपंपाचे विद्युतपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणने युद्धपातळीवर काम करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
जुलै महिन्यात आलेल्या महापुरात तालुक्यातील पंचगंगा काठावरील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. भात, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला यासारखी पिके तर गेलीच, शिवाय ऊसपिकांचेही नुकसान झाले आहे. महापुरात विद्युत खांब कोसळणे, तारा तुटणे, ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रकारही घडले आहे. पूर ओसरताच महावितरणने याची त्वरित दुरुस्ती करुन विद्युतपुरवठा पूर्ववत करणे गरजेचे होते. मात्र महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नदीकाठचा तसेच शेतीपंपाचा विद्युतपुरवठा अद्याप सुरू झाला नाही.
महापुरात कसेबसे वाचलेले काही क्षेत्रांतील ऊसपीक तसेच दुबार पेरणी केलेली पिके पाण्यासाठी तहानलेली आहेत. पावसानेही दडी दिल्याने पिके पाण्याअभावी वाळत आहेत. नदीत पाणी असूनही विद्युतप्रवाह नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे महापुरात वाचूनही त्यानंतर पाण्याअभावी पिके वाळत असल्याने ‘देवाने दिले अन् भुताने नेले’ अशीच अवस्था महापुरात वाचलेल्या पिकांची झाली आहे. त्यामुळे महावितरणने महापुराने त्रस्त झालेल्या बळीराजाला वाचविण्यासाठी विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
कोट -
महापुरात शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी पुरता जेरीस आला आहे. महापुरात जगलेली पिके वाचविण्यासाठी धडपडत असताना महावितरण विद्युतपुरवठा अद्याप सुरु न झाल्याने पुन्हा पिके वाळत आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीने किमान शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करून ज्यादा कर्मचारी घेऊन विद्युतपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा महावितरणवर मोर्चा काढावा लागेल.
-अॅड. जयकुमार पोमाजे, शेतकरी