लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, भविष्यात रकमेत वाढ करू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 07:35 PM2024-08-22T19:35:03+5:302024-08-22T19:35:49+5:30

सर्व बँकांना पैसे परस्पर न काढण्याबाबत निर्देश 

Ladaki Bahina Yojana will not be closed, we will increase the amount in future; Testimony of Chief Minister Eknath Shinde | लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, भविष्यात रकमेत वाढ करू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, भविष्यात रकमेत वाढ करू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम जिल्हयातील हजारो महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कल्याणकारी योजनांची सांगड घालून विकास कामे केली जात आहेत. लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत राज्यात १ कोटी ४० लाखांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला. यातील १ कोटी १० लाखांहून अधिक महिलांना पैसेही वितरीत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, लोकसभा खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजेश पाटील यांच्यासह अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व बँकांना पैसे परस्पर न काढण्याबाबत निर्देश 

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेला आर्थिक लाभ कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात समायोजित केला जाऊ नये. यासाठी खात्यातून पैसे परस्पर न काढण्याबाबत सर्व बँकांना कडक निर्देश दिले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

महिला सक्षमीकरणासह सुरक्षेसाठी प्राधान्य देणार

महिला सक्षमीकरणासह त्यांच्या सुरक्षेसाठीही प्राधान्य देण्यात येत असून बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे याबाबत न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचे म्हणाले. तसेच कोल्हापुरसाठी खंडपीठ होण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याचेही सांगितले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात असलेल्या ५० टक्के महिला आर्थिक सक्षम होवून त्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आल्या तरच देश विकसित होवू शकेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरअखेर सुमारे अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील यासाठी शासनाकडून प्रतिवर्षी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या योजनेबाबत राज्यातील महिलांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे. विकासापासून वंचित असणाऱ्या शेवटच्या घटकालाही मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शासन करीत असून खऱ्या अर्थाने शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने हे शासन वाटचाल करीत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देवून राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काटेकोर अंमलबजावणीसाठी शासन तत्पर असल्याचे सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्याने राज्याला भरपूर दिले असून खऱ्या अर्थाने पुरोगामी चळवळीला बळ दिले. या जिल्ह्यात महिलांच्या बचत गटाची चळवळ सक्षमपणाने उभी राहिली. राज्यात सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे सांगून शासन महिला भगिनींच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले. 

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लाडकी बहीण ही योजना कायम सुरुच ठेवणार असून कोणत्याही परिस्थितीत ती बंद होणार नाही असे सांगितले. यावेळी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमात शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील १० महिला लाभार्थी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ६ लाभार्थी, तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात उत्कृष्ट कार्य केलेल्या ५ अंगणवाडी सेविकांचा प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

Web Title: Ladaki Bahina Yojana will not be closed, we will increase the amount in future; Testimony of Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.