कुंचल्यातून साकारले लाडके ‘बाप्पा’
By admin | Published: September 14, 2014 11:21 PM2014-09-14T23:21:47+5:302014-09-15T00:07:53+5:30
बाल विकास मंच : ‘माय फ्रेंड गणेश’ या चित्रकला स्पर्धा उत्साहात
कोल्हापूर : आपल्या लाडक्या ‘बाप्पां’चे चित्र काढण्यासाठी सुरू असलेली लगबग, चिमुकल्यांची भिरभिरती नजर, लांबून पाहणारे पालक आणि बाल कलाकारांच्या भावविश्वातील उमटणारे ‘श्री गणेशा’चे विविध रूप कुंचल्याच्या साहाय्याने चित्ररूपात कागदावर साकारत होते. निमित्त होेतं ‘लोकमत’ बालविकास मंचच्यावतीने ‘माय फ्रेंड गणेश’ या चित्रकला स्पर्धेचे.
उषाराजे हायस्कूल येथे आज, शनिवारी झालेल्या या स्पर्धेसाठी कॅमलिन आणि चाणक्य इन्स्टिट्यूट आॅफ अॅबॅकस् हे या स्पर्धेचे प्रायोजक होते. गणेश उत्सवात जसे गणेशमूर्तीचे विविध दर्शन सर्वांना पाहण्यासाठी मिळाले, त्याचप्रमाणे आज मुलांनी आपल्या आवडीप्रमाणे गणेशाचे विविध रूप कागदावर साकारले. या स्पर्धेत ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तर इचलकरंजी येथे रोटरी क्लब लॉनवर ही स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेदरम्यान उषाराजे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विमल पोवार यांचा बाल विकास मंचतर्फे सत्कार करण्यात आला. मुलांच्या कलागुणांना ‘लोकमत’मुळे वाव मिळत असून, त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे मत पोवार यांनी यावेळी व्यक्त केले.