कोल्हापुरातील लाडक्या बहिणींनाच नको लाभ, योजना बंद करण्यासाठी केलेत अर्ज 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 22, 2025 12:39 IST2025-01-22T12:38:49+5:302025-01-22T12:39:49+5:30

इंदुमती गणेश कोल्हापूर : अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळत असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या व निकषात बसत ...

ladki bahin in Kolhapur applied for closure of the scheme | कोल्हापुरातील लाडक्या बहिणींनाच नको लाभ, योजना बंद करण्यासाठी केलेत अर्ज 

कोल्हापुरातील लाडक्या बहिणींनाच नको लाभ, योजना बंद करण्यासाठी केलेत अर्ज 

इंदुमती गणेश

कोल्हापूर : अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळत असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या व निकषात बसत नसलेल्या महिलांकडून योजना बंद करण्यासाठीचे अर्ज तहसील कार्यालयांमध्ये येत आहेत. लाडक्या बहिणीच्या अधांतरी भविष्यावर अवलंबून बसण्यापेक्षा पूर्वीपासून खात्रीशीर लाभ देत आलेल्या शासकीय योजनांवर महिलांचा जास्त विश्वास असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

राज्य शासनाने निवडणूक डोळ्यासमाेर ठेऊन लाडकी बहीण योजना जाहीर केली, त्याचवेळी त्याचे निकष जाहीर केले. मात्र, पडताळणीसाठी वेळ नसल्याने निकषात बसणाऱ्या व न बसणाऱ्या सगळ्या महिलांना लाभ दिला गेला. आता त्याला चाळणी लावली आहे. ज्यांची पांढरी शिधापत्रिका आहे, घरी चारचाकी आहे, उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळतो, निवृत्तीवेतन मिळते, शासकीय नोकरदार अशा महिलांना अपात्र करून पैसे वसूल केले जाणार आहे. तसा अधिकृत अध्यादेश नसला तरी त्यादृष्टीने हालचाली सुरू असल्याने महिलाच योजना बंद करून घेण्यासाठी येत आहेत.

वसुलीची धास्ती..

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी निकषात न बसणाऱ्या महिलांचे लाभाचे पैसे पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा करणार असल्याचे स्पष्ट केले. असा लाभ घेतलेल्या महिलांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्या स्वत:हून योजना बंद करण्यासाठी पुढे येत आहेत.

भवितव्याबद्दल साशंकता..

लाडकी बहीण योजना कितपत सुरू राहील याबद्दल साशंकता आहे. योजनेविरोधात उच्च न्यायालयात दावा सुरू आहे, सरकारी तिजोरी पार धुवून काढली आहे, हे शासनालाही डोईजड झाले आहे. त्यामुळे योजना कधी बंद होईल सांगता येत नाही ही भीती आहे.

पूर्वीच्या योजनांवर अधिक विश्वास

संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार-विधवा योजना, दिव्यांग योजना या राज्य व केंद्र सरकारच्या योजना वर्षानुवर्षे सुरू आहेत. उशीर झाला तरी लाभाचे पैसे हमखास मिळतात शिवाय त्यांच्या रकमेतदेखील वाढ होणार आहे. त्यामुळे लाडकी बहीणच्या आमिषात पडायला नको, पूर्वीच्या योजनाच बऱ्या अशी महिलांची मानसिकता आहे.

दोन्ही योजनांचा लाभ

करवीर तहसील कार्यालयामध्ये मंगळवारी काही महिला आम्हाला लाडकी बहीण योजना बंद करायची आहे, असा अर्ज घेऊन आल्या होत्या. त्यांना पूर्वीपासून संजय गांधी योजनेचा लाभ मिळतो, तरीही लाडकी बहीणचा लाभ घेतला अशा महिला योजना बंद करण्यासाठी स्वत:हून येऊ लागल्या आहेत.

Web Title: ladki bahin in Kolhapur applied for closure of the scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.