लाडक्या बहिणींच्या खात्रीला बँकांची कात्री; कोल्हापूर जिल्ह्यात अनेक महिलांना फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 04:00 PM2024-08-28T16:00:59+5:302024-08-28T16:01:32+5:30

योजनेचे पैसे खात्यावरून वर्ग 

Ladki Bahin Yojana money collusion by banks in Kolhapur district | लाडक्या बहिणींच्या खात्रीला बँकांची कात्री; कोल्हापूर जिल्ह्यात अनेक महिलांना फटका 

लाडक्या बहिणींच्या खात्रीला बँकांची कात्री; कोल्हापूर जिल्ह्यात अनेक महिलांना फटका 

कोल्हापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कर्जासह अन्य कारणांसाठी वर्ग केले जाणार नाही या मुख्यमंत्र्यांच्या खात्रीला बँकांकडून कात्री लावण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक महिलांच्या खात्यावर आलेले लाडकी बहीण योजनेचे बँकांकडून परस्पर कट करण्यात आले आहेत. विशेषत: राष्ट्रीयीकृत बँकांबद्दल या तक्रारी अधिक आहेत. मात्र महिला व बालविकास विभागाकडे याबाबतची थेट तक्रार द्यायला एकही महिला पुढे आलेली नाही.

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे पैसे जिल्ह्यातील जवळपास सात लाख महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. प्रत्येक महिलेच्या खात्यावर जुलै व ऑगस्टचे मिळून ३ हजार रुपये आले आहेत. पण ते पैसे हातात पडण्याआधीच बँकांनी महिलांच्या खात्यावरून ही रक्कम अन्य कारणांसाठी वर्ग केली आहे. थकीत कर्ज, मिनिमम बॅलेन्स, व्याज, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ही रक्कम बँकांनी कापून घेतली आहे.

या तक्रारी विशेषत: राष्ट्रीयीकृत बँकांच्याविरोधात आहेत. योजनेच्या प्रसारासाठी आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या खात्यावरील हे पैसे अन्य कोणत्याही कारणासाठी वळवू नयेत असे स्पष्ट केले. तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीदेखील बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन याबाबत निर्देश दिले होते.

येथे आले निदर्शनास..

कोपार्डे, नृसिंहवाडी, सरवडे (ता. राधानगरी) यासह ग्रामीण भागात महिलांच्या खात्यावरील ८०० ते १५०० रुपयांपर्यंतची रक्कम बँकांना कर्ज, मिनिमम बॅलेन्स, अन्य चार्जेसच्या नावाखाली कापून घेतली आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रमाण अधिक आहे.

अग्रणी बँकेकडून मौन..

खात्यावरील रक्कम बँकांनी कापून घेतल्यानंतरदेखील महिला व बालकल्याण विभागाकडे एकाही महिलेची लेखी तक्रार आलेली नाही. त्यामुळे कारवाई कुणावर करायची, असा प्रश्न आला आहे. याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी अग्रणी बँकेचे गणेश गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद किंवा माहिती मिळाली नाही.

लाडकी बहीण योजनेचे ३ हजार रुपये बँक ऑफ बडोदाच्या खात्यावर जमा झाले. पण बँकेने १५०० रुपये कापून घेतले. कारण विचारल्यावर बँकेचे वेगवेगळे चार्जेस कट केल्याचे सांगितले. तक्रार कुठे करायचे माहिती नव्हते म्हणून आम्हीही गप्प बसलो. - राजश्री पाटील, कासारपुतळे राधानगरी
 

माझे खाते बँक ऑफ बडोदामध्ये आहे. माेबाइलवर लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेच्या खात्यात जमा झाल्याचा मॅसेज आला. पैसे काढायला म्हणून गेले तर बँकेने खात्यातून ८५० रुपये परस्पर कापून घेतले. कारण विचारले तर म्हणाले, दोन वर्षांपासूनचे बँकेचे मोबाइल संदेशासह वेगवेगळ्या चार्जेससाठी है पेसे कापले. - सुजाता पाटील, कासारपुतळे, राधानगरी

Web Title: Ladki Bahin Yojana money collusion by banks in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.