स्कूटरवरून ‘लाहूल स्पिती व्हॅली मोहीम’ फत्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 02:09 PM2019-11-22T14:09:40+5:302019-11-22T14:11:21+5:30
पुढे पाच किलोमीटर सीमारेषेवर जवानांशी गप्पा मारून डोळ्यांत न मावणारे निसर्गसौंदर्य अनुभवत पुढचा प्रवास सुरू झाला. रिकांगपिओवरून टीमने काल्पाला मुक्काम केले. येथे किन्नर कैलासचं विलोभनीय सौंदर्य पाहायला मिळाले.
कोल्हापूर : लेह लडाखच्या प्रदीर्घ अनुभवानंतर कोल्हापुरातील ग्रुपने आॅगस्टमध्ये ‘लाहूल-स्पिती व्हॅलीमध्ये विना गिअर दुचाकी मोहीम’ फत्ते केली. या मोहिमेदरम्यान ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘वन है तो जल है’, ‘जल है तो कल है’ हा संदेश देण्यात आला. अरुण बेळगावकर यांच्या पुढाकाराने १२ दिवसांच्या या साहसी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगावकर यांनी यापूर्वी दुचाकीवरून लेड लडाखची मोहीम पार पाडली आहे; मात्र स्पिती व्हॅलीमध्ये विना गिअर स्कूटरने प्रवास अशी मोहीम पहिल्यांदाच आखण्यात आली. मेकॅनिकल क्रूसह चंदिगडमधून या मोहिमेला सुरुवात झाली. सिमला-सरहान-सांगला मुक्काम करत ही टीम पोहोचली. ११ हजार ३२० फुटांवरील देशातील सर्वांत शेवटचे गाव चितकूलमध्ये. हा प्रवास खडतर उंच डोंगरांतूनहोता. पुढे पाच किलोमीटर सीमारेषेवर जवानांशी गप्पा मारून डोळ्यांत न मावणारे निसर्गसौंदर्य अनुभवत पुढचा प्रवास सुरू झाला. रिकांगपिओवरून टीमने काल्पाला मुक्काम केले. येथे किन्नर कैलासचं विलोभनीय सौंदर्य पाहायला मिळाले. येथे वाहन लावून स्थानिक गाडीने काझाला ही टीम पोहोचली. येथे निसर्गाचे रौद्र आणि विलोभनीय दृश्य पाहायला मिळते.
यानंतर हिक्कीमकडे सगळ्यांचा प्रवास सुरू झाला. या दरम्यान स्नोलेपर्डचे दर्शन झाले. हिक्कीममधील पोस्ट आॅफिस जगातले सर्वांत उंचीवरील पोस्ट आॅफिस समजले जाते. येथून सर्वांनी आपापल्या घरी पत्र पाठविली. काल्पाला येथून जलोरी पासवरून शोजाला सगळे पोहोचले. उंच देवदाराची झाडं, सफरचंदाच्या बागा आणि निसर्ग असे हे दृश्य होते. इथे रात्रीच्या कॅम्प फायरनंतर दुसऱ्या दिवशी मंडीकडे परतीचा प्रवास सुरू झाला. मंडीमध्ये स्कूटर प्रवास संपून सर्वांनी दिल्लीकडे प्रयाण केले. या मोहिमेत प्रसाद मुंडले, प्रसाद कोल्हापुरे, ऐश्वर्या कोल्हापुरे, कौसल्या कारंडे, अनिता मुदगल, आशिष मुदगल, सुरेश चौगुले, रेड्डी, महेश दैव, सतीश पाटील, शार्दूल पवनगडकर यांनी सहभाग घेतला.