महापुरात ३ लाख शेतकऱ्यांचे १३०० कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:40 AM2019-09-12T00:40:44+5:302019-09-12T00:40:48+5:30
राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने ७८ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, तीन ...
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने ७८ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, तीन लाख सात हजार शेतकऱ्यांचे १२९९ कोटी ६५ लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या शेतकºयांना राज्य आपत्ती निवारण मदत निधीतून ६३० कोटी २० लाख, तर केंद्रीय आपत्ती निवारण मदत निधीतून १०५ कोटी ४४ लाख रुपये मिळणार आहेत.
आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराने जनजीवन अक्षरश: उद्ध्वस्त केले. महापुराच्या पाण्याने नदी, ओढ्याच्या काठावरील पिके पाण्याखाली गेली. अतिवृष्टीने बांधफुटी होऊन उर्वरित पिके गाढली गेली. प्रलयकारी महापुराच्या पाण्यात आठ-१0 दिवस ऊस व भात पिके राहिल्याने कुजली. पिकांच्या नुकसानीचा अंदाज राज्य सरकारने मागविला होता. त्यावेळी एक लाख पाच हजार हेक्टरवरील पिके बाधित असल्याचा अंदाज वर्तविला होता. यामध्ये सर्वाधिक ७५ हजार हेक्टरवरील ऊस पिकांचा समावेश होता. पावसाने उघडीप दिल्यानंतर महसूल, कृषीसह इतर विभागांच्या अधिकाºयांनी पंचनामे सुरू केले. पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले असेल, तरच संबंधित शेतकºयांचा पंचनामा केला. तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकाºयांनी थेट बांधावर जाऊन पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. दोन दिवसांपूर्वी पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, यामध्ये ७८ हजार १०२ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला आहे.
यामध्ये ६१ हजार ९९९ हेक्टर उसाच्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. भाताचे ८४६६ हेक्टर, तर सोयाबीनचे २६७२ हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचे निदर्शनास आली आहेत. एकूण तीन लाख सात हजार ७१८ शेतकºयांची ७८ हजार १०२ हेक्टरमधील पिके बाधित झाली असून, त्यांचे १२९९ कोटी ६५ लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
शेतकºयांना केंद्रीय आपत्ती निवारण मदत निधीतून १०५ कोटी ४४ लाख, तर राज्य आपत्ती निवारण मदत निधीतून ६३० कोटी २० लाख असे ७३५ कोटी ६४ लाखांची मदत मिळणार आहे. सरकारकडे अहवाल गेला असला, तरी शेतकºयांच्या हातात पैसे पडण्यास किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
उसाला हेक्टरी १.१३ लाखाची मदत
उसाला राज्य आपत्ती मदत निधीतून हेक्टरी एक लाख, तर केंद्रीय आपत्ती निधीतून १३ हजार ५०० रुपये असे एक लाख १३ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. भाताला राज्याकडून हेक्टरी ६८०३ रुपये, तर केंद्राकडून १३ हजार ५०० असे २० हजार, तर सोयाबीन व भुईमुगाला तेवढीच मदत मिळणार आहे.
पीकनिहाय झालेले नुकसान हेक्टरमध्ये असे-
पीक अतिवृष्टी महापूर एकूण
ऊस ३५७५ ५८४२३ ६१९९९
भात १७६० ६७०६ ८४६६
सोयाबीन ६५८ २०१४ २६७२
भुईमूग ५१४ १७४८ २२६२
भाजीपाला २६२ ६२३ ८८५
फुले ६ ६४ ७०
फळे ५२ ५१ १०३