हजारो दीपज्योतींनी लखलखला कोल्हापूर पंचगंगा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:30 AM2018-11-24T11:30:28+5:302018-11-24T11:38:57+5:30

रम्य पहाटेची प्रसन्नता आणि जोडीला संथ वाहणारी पंचगंगा नदी, प्रबोधनात्मक आकर्षक भव्य दिव्य रांगोळ्यांची सजावट आणि जोडीला समाधीमंदिरावरील हजारो दिव्यांचा झगमगाट, नयनरम्य विद्युत रोषणाई,

Lakhkhali Kolhapur Panchaganga Ghat by Thousands of Deepjyoti | हजारो दीपज्योतींनी लखलखला कोल्हापूर पंचगंगा घाट

हजारो दीपज्योतींनी लखलखला कोल्हापूर पंचगंगा घाट

googlenewsNext
ठळक मुद्देदीपोत्सव; आकर्षक रांगोळ्या अन् जोडीला स्वर उत्सवाच्या साथीने रंगला सोहळा प्रसन्न वातावरणात दीपोत्सव व आकर्षक प्रबोधनात्मक रांगोळ्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

कोल्हापूर : रम्य पहाटेची प्रसन्नता आणि जोडीला संथ वाहणारी पंचगंगा नदी, प्रबोधनात्मक आकर्षक भव्य दिव्य रांगोळ्यांची सजावट आणि जोडीला समाधीमंदिरावरील हजारो दिव्यांचा झगमगाट, नयनरम्य विद्युत रोषणाई, आतषबाजीने सप्तरंगात उजळलेला आसमंत अशा तेजोवलयात पंचगंगेचा काठ शुक्रवारी पहाटे उजळला. त्रिपुरारी पौर्णिमेला जलाशयांसह मंदिरांमध्ये पहाटे किंवा सायंकाळी दीप प्रज्वलित करून या दीपावली पर्वाची सांगता करण्याची प्रथा आहे. यानिमित्त पंचगंगा नदीघाट परिसरात शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी पहाटे ५१ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले.

यानिमित्त नदीघाटांसह ब्रह्मपुरी, महादेव मंदिर, कृमकेश्वर मंदिर, रावणेश्वर, पिकनिक पॉर्इंट, परिसरातील दीपमाळांवर नागरिकांनी पहाटे तीन वाजल्यापासून दिवे प्रज्वलित करण्यास सुरुवात केली. नदीपात्रात असलेल्या समाधी मंदिरावरही विविधरंगी लेझर किरणांचा प्रकाशझोत टाकण्यात आला होता; त्यामुळे हा परिसर नयनरम्य डोळ्याला सुखवणारा दिसत होता. या उत्सवाची सुरुवात दीपपूजनाने झाली.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते. या दीपोत्सवाच्या आयोजनात अक्षय मोरे, दीपक देसाई, प्रवीण चौगले, विजय अगरवाल, अवधूत कोळी, प्रशांत बोरगावकर, अनिल शिंदे, ऋतुराज सरनोबत, सुजय मेंगाणे, धनंजय जरग, ऋषिकेश भांदिगरे, विक्रम सरनोबत, रितेश सूर्यवंशी, महेश पाटील, ओंकार गुरव, श्रीधर हांडे, शहारूख गडवाले, आदींनी परिश्रम घेतले. रांगोळीकरिता अनेक रंगावलीकारांनी गुरुवारी (दि. २२) रात्री नऊ वाजल्यापासून रांगोळी काढण्यास सुरुवात केली होती. या अपूर्व सोहळ्याचा आनंद पहाटे तीन वाजल्यापासून हजारो नागरिकांनी लुटला.

लक्षवेधी रांगोळ्या
दीपोत्सवासह पंचगंगा नदीघाट परिसरात प्रबोधनात्मक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यात शुक्रवार पेठेतील भोपेराव बॉईज ने ‘आरक्षण एक प्रश्नचिन्ह’, यासह ‘लढा आमचाही .. आणि तुमचाही ’ अशी मराठा आरक्षणावरील रांगोळी, तर जुना बुधवार पेठेतील श्री प्रेमी तरुण मंडळाने ‘महाराष्ट्र पोलीस वर्दितला माणूस आॅन ड्युटी २४ तास ’ , सगळेच नसतात रे, टेबलाखालून घेणारे... , खुप सारे असतात आपलं आयुष्य पणाला लावणारे’ ही, तर उत्तरेश्वर मर्दानी आखाडाने सर्व खेळांची जागृती करणारी रांगोळी रेखाटली होती. हाय कमांडो फ्रेंड्स सर्कलने कॉमन मॅन रंगावलीत रेखाटला होता. अशा एक ना अनेक रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. या सर्वांच्या जोडीला ‘वादक प्रतिष्ठान’ ने पंचगंगा प्रदूषणासंबंधी दिव्यांच्या माध्यमातून ‘प्रदूषणमुक्त पंचगंगा’ साकारले होते.

भक्तिगीतांनी दीपोत्सवाची रंगत वाढली
महेश हिरेमठ प्रस्तूत ‘स्वरउत्सव’तर्फे दीपोत्सव पहाट म्हणून भावगीत, भक्तिगीते सादर करण्यात आली. यात महेश हिरेमठ व सोनाली बारटक्के यांनी गणपती स्रोत्र सुर निरागस हो, गजपती गणपती वक्रतुंड महाकाय याने सुरुवात केली. उत्तरोत्तर रंगलेल्या या मैफलीत ‘अंबाबाईची भूपाळी’, ‘गोंधळ’, ‘गणपती भूपाळी’, ग. दी. माडगुळकरांच्या गीत रामायणातील गीते, ‘शेतकरी गीते’ आणि ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या गीताने सांगता झाली. यात भार्गव कांबळे, गुरू ढोले, सुनील गुरव, निवेदक स्वप्निल पन्हाळकर यांनी साथ संगत केली.

वाहतुकीची कोंडी
दीपोत्सव पाहण्यासाठी अख्ख शहर लोटले होते; त्यामुळे पहाटे तीन वाजल्यापासून पंचगंगा तालीम ते शिवाजी पूल मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहनेच वाहने दिसत होती. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यातून वाट काढत जाणारे नागरिक, वेडीवाकडी लावलेल्या वाहनांना वाट करून देताना होणारे वाद असे चित्र होते. त्यामुळे पुढील वर्षी तरी संयोजन करणाऱ्या मंडळींनी पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सर्व छाया : आदित्य वेल्हाळ

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठ हजारो दीपज्योतींच्या लखलखाटाने उजळून निघाला.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसरात ‘महालक्ष्मी प्रतिष्ठान’ने आकर्षक रांगोळीसह ‘शिवाजी महाराजांना आई जगदंबा अंबाबाई तलावर देताना’चा देखावा सादर केला होता.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसरात ‘वादक प्रतिष्ठान’ या ढोल ताशा पथकातील कार्यकर्त्यांनी ‘प्रदूषणमुक्त पंचगंगा’ असे दीपज्योती लावून पंचगंगेच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसरात युवतींनी दीपप्रज्वलित करून या सोहळ्यात सहभाग घेतला.

पंचगंगा १०
कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसरात शुक्रवारी पहाटे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या दीपोत्सव शहरवासियांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला. यावेळी हजारो दीपांच्या लखलखत्या प्रकाशाने आणि भव्य दिव्य रांगोळी व महादेव मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसरात पहाटेच्या प्रसन्न वातावरणात दीपोत्सव व आकर्षक प्रबोधनात्मक रांगोळ्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसरात पहाटेच्या प्रसन्न वातावरणात दीपोत्सव व आकर्षक प्रबोधनात्मक रांगोळ्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
(सर्व छाया : आदित्य वेल्हाळ)
 

Web Title: Lakhkhali Kolhapur Panchaganga Ghat by Thousands of Deepjyoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.