लांजात दीड कोटीचे मद्य जप्त
By admin | Published: June 19, 2015 11:46 PM2015-06-19T23:46:31+5:302015-06-20T00:39:19+5:30
उत्पादन शुल्क विभाग, रत्नागिरीचे अधीक्षक संतोष झगडे यांना वरिष्ठ स्तरावरून गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस कर्मचारी या ट्रकच्या मागावर होते.
रत्नागिरी : लांजा येथून साखरप्याकडे निघालेल्या ट्रकवर छापा टाकून गोव्याहून मध्य प्रदेशात नेण्यात येत असलेले मध्य प्रदेश बनावटीचे १ कोटी ४४ लाख रुपयांचे बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. त्याशिवाय २० लाख किमतीचा ट्रक जप्त करण्यात आला असून, दोनपैकी एका चालकाला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी रात्री ही कारवाई केली. या वर्षातील राज्यातील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभाग, रत्नागिरीचे अधीक्षक संतोष झगडे यांना दोन दिवसांपूर्वीच वरिष्ठ स्तरावरून याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी विभागाचे भरारी पथक व उत्पादन शुल्कचे लांजा विभाग निरीक्षक, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी या ट्रकच्या मागावर होते. गुरुवारी रात्री लांजा येथे महामार्गावर जंगल भागात एका ठिकाणी संशयास्पद दहाचाकी ट्रक अडविण्यात आला. चालकाकडे चौकशी केली असता ट्रकमध्ये कोलगेट प्रॉडक्ट असून, ट्रक राजस्थानकडे जात असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबतची कागदपत्र, बिलेही दाखविण्यात आली. मात्र, पावत्यांवर असलेला ट्रकचा नंबर व प्रत्यक्षात ट्रकचा नंबर यात तफावत आढळली. तसेच हा ट्रक मुख्य मार्गाने न जाता आडमार्गाने जात असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता आत मध्य प्रदेश बनावटीच्या मद्याचे दोन हजार बॉक्स आढळून आले. या विदेशी मद्याबाबत चालकाला विचारणा केली असता त्याने या मद्य वाहतुकीबाबत कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. तसेच त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवानाही नसल्याचे सांगितले. त्याचवेळी ट्रकमध्ये असलेला दुसरा चालक अंधाराचा व पावसाचा फायदा घेत फरार झाला.
याप्रकरणी पंचनामा करून पोलिसांनी आरोपी चालक महेंद्र तिलक्या नायक (रा. अवंतिकानगर, इंदोर, तालुका ठिकरी, जिल्हा-धार, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली. मद्यसाठ्याबरोबरच २० लाख किमतीचा केए-२०जे-८५३२ क्रमांकाचा ट्रकही जप्त करण्यात आला आहे. दुसऱ्या फरार चालकाचा शोध सुरू आहे.
रत्नागिरी विभागाचे अधीक्षक झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत निरीक्षक संजय तवसाळकर, शामराव पाटील, अतुल पाटील, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, सहायक दुय्यम निरीक्षक सुनील चिले, राजेंद्र शेट्ये, जवान विजय हातिसकर, सुरेश शेगर, निनाद सुर्वे, वैभव सोनावल, चक्रपाणी दहिफळे, वाहनचालक मिलिंद माळी, विशाल विचारे व मलिक धोत्रे, महिला जवान अनिता डोंगरे, लांजा पोलीस निरीक्षक यादव, उपनिरीक्षक विक्रम पाटील व स्थानिक कर्मचारी यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)