महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांना लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:30+5:302021-01-10T04:17:30+5:30
कोल्हापूर : लाल मातीत भल्या-भल्यांना लोळवणारे महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्या मदतीचे लोकमतमध्ये प्रसिध्द झालेले ...
कोल्हापूर : लाल मातीत भल्या-भल्यांना लोळवणारे महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्या मदतीचे लोकमतमध्ये प्रसिध्द झालेले वृत्त वाचून ठाण्याच्या खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने एक लाखांचा धनादेश शुक्रवारी (दि.०८) सोलापूरचे शिवसेना जिल्हा समन्वयक अमृत काटकर यांनी शेख यांच्याकडे सुपुर्द केला.
मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावातील आप्पालाल यांनी १९८६ ते १९९७ पर्यंत नामवंत वस्ताद महमद हनिफ, हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्याकडे कुस्तीचे धडे गिरविले. महाराष्ट्र केसरी, राष्ट्रीय अजिंक्यपद, विश्वचषक कुस्ती स्पर्धा, ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत खुल्या गटात सुवर्ण अशी कामगिरी केली. काही महिन्यांपासून ते मधुमेह व मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. लोकमतमधून त्यांना मदतीचा हात हवा असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली. त्यानुसार शुक्रवारी (दि. ८) रोजी श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फे शेख त्यांना एक लाखांचा धनादेश सुपूर्द केला. त्यांनी शेख यांच्या आजारपणातील खर्चाचीही जबाबदारी उचलली आहे. राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनीही शेख यांच्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी राज्य शासन उचलेल, अशी ग्वाही कुटुंबीयांना दिली.
फोटो : ०९०१२०२१-कोल-आप्पालाल शेख
ओळी : महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांना उपचाराकरिता ठाण्याच्या श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फे शुक्रवारी एक लाखांचा धनादेश शिवसेनेचे अमृत काटकर यांच्या हस्ते सुपूर्द केला. यावेळी मंगेश चिवटे उपस्थित होते.