भरदिवसा बारा लाखांचे दागिने लंपास
By admin | Published: August 28, 2014 11:53 PM2014-08-28T23:53:22+5:302014-08-29T00:07:29+5:30
इचलकरंजीतील घटना : दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद
इचलकरंजी : येथील गांधी पुतळा चौकातील चौंडेश्वरी ज्वेलर्स दुकानाजवळून सुमारे बारा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची घटना आज, गुरुवारी घडली. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पिशवी लंपास करणारे चोरटे दुकानाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दरम्यान, दिवसाढवळ्या चोरीची घटना घडल्याने परिसरासह सराफ व्यावसायिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
गांधी पुतळ्याजवळ उत्तम शामराव ढवळे यांचे चौंडेश्वरी ज्वेलर्स नामक दुकान आहे. ज्वेलर्स दुकानाजवळच त्यांच्या भावाचे हॉटेल असून, या ठिकाणी वडीलही काम पाहतात. दररोज रात्री हॉटेल आणि ज्वेलर्सचे दुकान बंद करून
ढवळे कुटुंबीय घरी जातात. नेहमीप्रमाणे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उत्तम ढवळे ज्वेलर्स दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या पायरीवर घाण पडल्याचे दिसले.
त्यामुळे ढवळे यांनी त्यांच्याकडे असलेली कापडी पिशवी वडील शामराव ढवळे यांना सांगून हॉटेल काउंटरच्या आत ठेवली. त्यानंतर दुकानाची पायरी स्वच्छ करून थोड्या वेळात ते परत आले असता ठेवलेली कापडी पिशवी जाग्यावर नव्हती. सुमारे बारा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, तसेच दुकानाच्या किल्ल्या असलेली पिशवी लंपास झाल्याने शोधाशोध सुरू केली.
यावेळी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता हॉटेलमध्ये वडापाव खाण्यासाठी आलेल्या १६ ते २० वर्षे वयाच्या दोघा अज्ञातांनी पिशवी लंपास केल्याचे स्पष्ट झाले. भरचौकात असलेल्या या हॉटेलमधील चोरीची घटना समजताच दुकानाजवळ नागरिकांनी गर्दी केली होती.
ढवळे यांनी याबाबत गावभाग पोलीस ठाण्यास माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक जगदीश धर्मे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर उत्तम ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीत पिशवीतील मंगळसूत्र, टॉप्स, डूल, रिंगा, अंगठ्या, कर्णफुले असे एकूण ३९० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख ३३ हजार असा सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे नमूद केले. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजवर मिळालेल्या माहितीद्वारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)