नोकरीच्या आमिषाने तरुणांना लाखोंचा गंडा
By admin | Published: January 4, 2015 01:06 AM2015-01-04T01:06:51+5:302015-01-04T01:21:34+5:30
तिघांना अटक : मॉलमध्ये नियुक्तीची बोगस पत्रे
कोल्हापूर : नामांकित मॉलसह सैन्यामध्ये नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या वडणगेच्या मुख्य भामट्यासह तिघाजणांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांना आज, शनिवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. मुख्य सूत्रधार संशयित आरोपी संदीप बाळू घोरपडे
(वय ३०, रा. वडणगे, ता. करवीर), रोहित संजय माने (२५, रा. शुक्रवार पेठ), करिष्मा तुकाराम भोळे (२१, रा. विक्रमनगर) अशी त्यांची नावे आहेत. संशयित सर्जेराव बत्तासो माने, राजू वसंत पाटील (दोघे रा. वडणगे, ता. करवीर) हे फरारी आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले, टोळीप्रमुख संदीप घोरपडे याने रोहित माने व करिष्मा भोळे यांच्या मदतीने कोल्हापुरातील विविध मॉल्समध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवीत अडीचशेहून अधिक बेरोजगारांकडून ५०० ते २००० हजार रुपये घेऊन त्यांना बनावट लेटरपॅडवर नियुक्तीपत्रे दिली. त्यामध्ये लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉलचाही समावेश होता.
नियुक्तीपत्रे घेऊन काही बेरोजगार तरुणांनी रिलायन्स मॉलचे मनुष्यबळ विकास अधिकारी राजेश गोतमारे यांची भेट घेतली. त्यावेळी ही बोगस नियुक्तीपत्रे असून, आमच्याकडे अशी कोणतीही नोकरभरती सुरू नसल्याचे गोतमारे यांनी सांगितले. त्यांनी याप्रकरणी संशयित संदीप घोरपडे, संदीप माने व करिष्मा भोळे यांच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी या तिघांना अटक केली. याप्रकरणी अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक बी. एस. मंडले करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी संदीप घोरपडे, सर्जेराव माने व राजू पाटील यांनी विकास आनंदराव मोहिते (वय २१, रा. इस्पुर्ली, ता. करवीर) याचा भाऊ अविनाश मोहिते याला सैन्यामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन लाख रुपये घेतले. दरम्यान, पैसे देऊनही नोकरी लावण्यास टाळाटाळ केल्याने विकास मोहिते याने करवीर पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
संदीप घोरपडे याच्यावर लागोपाठ दोन गुन्हे दाखल झाल्याने त्याने हजारो तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच घोरपडे याने फसवणुकीची माहिती दिली.
रॅकेट उघड होण्याची शक्यता
करिष्मा एंटरप्रायजेस नावाने कंपनी काढून संशयित आरोपी संदीप घोरपडे व संदीप माने यांनी कागदी गल्लीमध्ये एका इमारतीच्या बेसमेंटला सहा महिन्यांपूर्वी कार्यालय सुरू केले.
‘नोकरीची हमखास संधी’ अशी जाहिरात करून लोकांना आकर्र्षित करून घेतले. या कार्यालयामध्ये बेरोजगारांकडून अर्ज भरून घेण्याचे काम करिष्मा भोळे ही तरुणी करीत होती. तिच्यासोबत आणखी दोन तरुणी होत्या. अर्ज भरण्यासाठी याठिकाणी बेरोजगार तरुण-तरुणींची रांगच लागली होती. या टोळीमध्ये आणखी दोन तरुणींसह काहीजणांचा सहभाग आहे. पोलिसांनी तिघांनाच पोलीस रेकॉर्डवर दाखविले असले, तरी मोकाट फिरणाऱ्या अन्य आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.