विचारेमाळ परिसरात लाखोंच्या साड्या आगीत भस्मसात

By सचिन भोसले | Published: January 12, 2024 07:47 PM2024-01-12T19:47:46+5:302024-01-12T19:47:53+5:30

शार्टसर्कीटने लागली आग : नागरीकांमध्ये घबराट

Lakhs of sarees were destroyed in the fire in vicharemal area | विचारेमाळ परिसरात लाखोंच्या साड्या आगीत भस्मसात

विचारेमाळ परिसरात लाखोंच्या साड्या आगीत भस्मसात

कोल्हापूर : साड्यांना इस्त्री करताना शार्ट सर्कीटने लागलेल्या आगीत लाखो रुपये किंमतीच्या साड्या, शिलाई मशिन्स, प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी विचारेमाळ परिसरातील धरतीमाता हौसिंग सोसायटीत घडली. अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल होत, ही आग विझवली.

अग्निशमन दलाकडून मिळालेली माहिती अशी की, धरतीमाता हौसिंग सोसायटीमध्ये सुनिता कांबळे यांच्या मालकीचे दोन मजली घर आहे. या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोल्या त्यांनी उत्तरप्रदेशातील महम्मद रफीक अली यांना भाड्याने देण्यात आल्या आहेत. ते पत्नी आणि दोन मुलांसह गेल्या चार वर्षांपासून राहतात. साड्यांना पिकोफॉल आणि सजावट करून त्या साडया सुरतला पाठविल्या जातात. शुक्रवारी दुपारी साड्यांना इस्त्री करण्याचे काम सुरू होते. यावेळी महम्मद हे प्रार्थनेसाठी ते सदर बाजारमधील मशिदीमध्ये गेले होते. यादरम्यान कपड्यांनी पेट घेतली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले.

कांबळे कुटूंबियांनी दुसऱ्या मजल्यावर धाव घेवून तात्काळ घरातील सिलेंडर बाहेर काढले. दरम्यान स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला वर्दी दिली. कसबा बावडा फायर स्टेशन आणि सासने ग्राऊंड फायर स्टेशनकडील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, स्थानक अधिकारी जयवंत खोत, चालक नवनाथ साबळे, सैफ म्हालदार, मनिष कुंभार, विजय पाटील, अजित मळेकर, आशिष माळी यांनी आग विझवण्यासाठी तत्परतेने प्रयत्न सुरू केले. आगीचा भडका मोठा होता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी आग विझवण्यासाठी कर्मर्चा­यांना मदत केली. सुमारे तासाभरात ही आग आटोक्यात आली. या आगीमध्ये महम्मद अली यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

आणि नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला
या सोसायटीचा परिसर दाटीवाटीचा आहे. त्यात कपड्यांनी वेगानी पेट घेतल्याने आगीने काही क्षणात रौद्र रुप धारण केले. ही आग अन्य घरांमध्ये पसरेल या भितीने नागरीकांमध्ये घबराट पसरली होती. अग्निशमन दलाचे जवानांनी तत्काळ जीवाची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळवले आणि नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला.

Web Title: Lakhs of sarees were destroyed in the fire in vicharemal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.