लक्ष्मीसाठी दिग्गजांचे देव पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:23 AM2021-01-20T04:23:40+5:302021-01-20T04:23:40+5:30
'लक्ष्मी-विलास पॅलेस' आताचे आरक्षण (सर्वसाधारण महिला ) रमेश पाटील कसबा बावडा : बावड्याच्या मूळ गावठाणातील सधन शेतकऱ्यांचा व प्रचंड ...
'लक्ष्मी-विलास पॅलेस'
आताचे आरक्षण
(सर्वसाधारण महिला )
रमेश पाटील
कसबा बावडा : बावड्याच्या मूळ गावठाणातील सधन शेतकऱ्यांचा व प्रचंड आर्थिक सुबत्ता असलेल्या रहिवाशांचा प्रभाग असलेल्या 'लक्ष्मी-विलास पॅलेस' या प्रभाग क्रमांक ५ मधून उमेदवारी मिळविण्यासाठी दिग्गजांनी देव पाण्यात ठेवले आहेत. हा प्रभाग आता सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने या प्रभागातील अनेक दिग्गजांनी आपल्या पत्नीला रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी देताना नाकीनऊ येणार आहे. लक्ष्मी-विलास पॅलेस हा प्रभाग मागील २०१५ च्या निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी आरक्षित होता. माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी या प्रभागाचे नेतृत्व केले होते. आता हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने अशोक जाधव यानी अन्य प्रभागांकडे आपला मोर्चा वळविला आहे. २००५ च्या निवडणुकीत विजयी झालेल्या माणिक जयवंत पाटील यांनी काँग्रेसकडून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे; तर परिवहन समितीचे माजी सभापती अजित पोवार-धामोडकर यांनी पत्नी रूपाली पोवार यांच्यासाठी प्रयत्न चालविला आहे. विशेष म्हणजे माणिक पाटील व अजित पोवार यांनी २०१० मध्ये एकमेकाविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यात अजित पोवार विजयी झाले होते. आता हे दोघेही पालकमंत्री सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते आहेत.
प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते रोहन ऊर्फ पप्पू दत्तात्रय पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरू ठेवली होती. विविध स्पर्धांचे आयोजन करणे, सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणे यामुळे त्यांचा अनेक मंडळांशी, कार्यकर्त्यांशी जवळचा संबंध आहे. त्याच्याच जोरावर त्यांनी निवडणूक लढवण्याचे ठरविले होते. मात्र, प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांनी पत्नी स्नेहल पाटील यांना रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे.
याशिवाय सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक संभाजी जाधव यांनी पत्नी वैशाली जाधव, बांधकाम व्यावसायिक, इंजिनिअर तानाजी चव्हाण यांनी पत्नी मंगल चव्हाण, मंजिरी रमेश पाटील, आदिती अनिरुद्ध पाटील, सेवानिवृत्त सहायक फौजदार दत्तात्रय मासाळ यांच्या भावजय व शिक्षक कै. शहाजी मासाळ यांच्या पत्नी स्वाती मासाळ, संगीता सुरेश उलपे हे महापालिकेत जाण्यासाठी इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत या प्रभागातून राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानीने आपले उमेदवार उभे केले होते. यावेळी भाजप-ताराराणी आघाडीचा उमेदवार रिंगणात असेल.
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते: १) अशोक जाधव ( काँग्रेस ) ३२९१ (विजयी )
२) लक्ष्मण करपे (राष्ट्रवादी ) ५३९ ३) प्रकाश कोळी (शिवसेना) ३१६ ४) अनिल माळी (स्वाभिमानी) ५२
प्रभागातील सुटलेले नागरी प्रश्न :
प्रभागात २० लाख लिटर क्षमतेची १ कोटी ७६ लाख रुपये खर्चून पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्यामुळे प्रभागातील पाण्याचा प्रश्न मिटला. प्रभागात १८ रस्ते फेवर पद्धतीने केले आहेत, तर काही पॅसेज ठिकाणचे रस्ते सिमेंटचे करण्यात आले आहेत. गटारींची कामे करण्यात आली आहेत. प्रभाग एलईडी बल्बने उजळून टाकण्यात आला आहे. प्रभागात तब्बल पाच कोटींहून अधिक रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत.
प्रभागातील शिल्लक प्रश्न :
प्रभागातील पाटील गल्ली व चौगले गल्लीमधील पॅसेजचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत पडला आहे. याठिकाणी सांडपाण्याची निर्गत व्यवस्थित होत नसल्याने पावसाळ्यात अनेकांना रोगराईशी सामना करावा लागतो.
कोट : प्रभागातील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण केले. त्यासाठी सुमारे पावणेदोन कोटी रुपये खर्च करण्यात आला. प्रभाग एलईडी दिव्यांनी उजळून टाकला. प्रभागातील बहुतेक सर्व रस्ते पूर्ण केले आहेत. गटारींची कामे केली आहेत. प्रभागात नेहमी औषध फवारणी, साफसफाई होते. प्रभागात एकूण पाच कोटी रुपयांची कामे केली आहेत.
अशोक जाधव, नगरसेवक
फोटो: १९ प्रभाग क्रमांक ५
पाटील गल्ली- चौगले गल्ली पॅसेजमधील सांडपाण्याची निर्गत व्यवस्थित होत नसल्याने ठिकठिकाणी गटर अशी तुंबून राहिलेली असते.