यड्रावमध्ये लक्ष्मी यात्रा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:27 AM2021-09-05T04:27:50+5:302021-09-05T04:27:50+5:30
यड्राव : येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीची यात्रा शासकीय नियम पाळून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. धनगरी ...
यड्राव : येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीची यात्रा शासकीय नियम पाळून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. धनगरी ढोलच्या गजरात देवीची गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भांडाऱ्याची उधळण व देवीचा जयघोष करण्यात आला. मंदिरात मारुती माने यांनी भाकणूक केली. प्रारंभी सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर यांच्या वाड्यात लक्ष्मी देवीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर धनगरी ढोलाच्या वाद्यात गाव प्रदक्षिणा घालून पालखी मिरवणूक मंदिरात आणण्यात आली. यावेळी मंदिर प्रदक्षिणा, आरती करण्यात आली. हेडंब खेळ झाल्यावर भाकणूक झाली.
या वेळी, तरणा-म्हातारा पाऊस आलम दुरी होईल. राजकारणात खरीपानंतर उतराई होईल, नदीकाठचे सरपण कायम राहील, उसाचा कांड कायम राहील, पांढरा धान उगम धान राहील, सोनं काठीला बांधून फिरशीला, चांदी लाखाची होईल, पैसे देऊन न्याय मिळणार नाही, गद्दारी करशीला, थोबाडीत खाशीला, अशी भाकणूक मारुती माने यांनी केली. या वेळी सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, रमेश माने, सरदार सुतार, राजाराम माने, भीमा हराळे, मायाप्पा माने, आप्पासो लवाटे यांच्यासह भाविक उपस्थित होते.