corona virus - लक्ष्मीपुरीतील गर्दी हटता हटेना, पोलिसांची डोकेदुखी वाढली : भाजीपाला, धान्य खरेदी जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:49 PM2020-03-24T17:49:56+5:302020-03-24T17:53:34+5:30
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी लावली असतानाही लोकांचा खरेदीचा उत्साह काही कमी होताना दिसत नाही. लक्ष्मीपुरी बाजारपेठेत तर पोलिसांनाही गर्दी आवरेना झाली आहे. मंगळवारी दिवसभर अशीच परिस्थिती कायम होती. गर्दी वाढल्याने दुपारी पोलिसांनी काहीजणांना काठीचा प्रसादही दिला.
कोल्हापूर : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी लावली असतानाही लोकांचा खरेदीचा उत्साह काही कमी होताना दिसत नाही. लक्ष्मीपुरी बाजारपेठेत तर पोलिसांनाही गर्दी आवरेना झाली आहे. मंगळवारी दिवसभर अशीच परिस्थिती कायम होती. गर्दी वाढल्याने दुपारी पोलिसांनी काहीजणांना काठीचा प्रसादही दिला.
संचारबंदी वाढण्याच्या भीतीने धान्य आणि भाजीपाल्याची अतिरिक्त खरेदी केली जात आहे. जो तो उठतो आणि लक्ष्मीपुरी गाठतो, अशी परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पोलिसांकडून सातत्याने आवाहन केले जात असतानाही जनता त्यांना अजिबात जुमानताना दिसत नाही.
एकाच ठिकाणी गर्दी करू नका, असे सांगूनही घोळक्याने खरेदी सुरू असल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत नागरिकांना हुसकावण्यास सुरुवात केली. काहीजणांना काठीचे दणकेही दिले. त्यामुळे काहीकाळ पांगापांग झाली; पण परत सगळे रस्त्यांवर आले.
गावबंदी, नाकाबंदी, जिल्हाबंदी झाल्याचा परिणाम आवकेवर झाला आहे. धान्याची आवक थांबली असली तरी जीवनावश्यक म्हणून भाजीपाला मात्र बाजारामध्ये येत आहे; पण गिºहाईक नसल्याने बराच भाजीपाला पडून आहे. दरही स्थिरच आहेत. व्यापाऱ्यांकडून वाढीव दराने विक्री होत आहे, तर स्वत: विक्री करीत असलेले शेतकरी मात्र पडेल त्या किमतीला विकून लवकर घर गाठणे पसंत करीत आहेत.
काकडी ढिगावर
पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले गाव हे काकडीसाठी प्र्रसिद्ध आहे. सध्या गाव बंद आहे; पण काकडी हा नाशवंत माल असल्याने गावातूनच टेम्पो भरून महिला कोल्हापूर शहरात येऊन काकडी विकत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकात पोलीस बसू देत नसल्याने मंगळवारी लक्ष्मीपुरीसह आजूबाजूच्या रस्त्याकडेला महिला मोठ्या प्रमाणावर काकडी विक्रीसाठी बसल्या होत्या. ग्राहक नसल्याने किलोऐवजी ढिगावर काकडी विकावी लागत आहे.
हमालाची कामे मालकांवर
लक्ष्मीपुरी धान्यबाजारात शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांतील हमाल मोठ्या प्रमाणावर आहेत. वाहतूक व नाकाबंदीमुळे हे हमाल शहरात येऊ शकत नाहीत. त्यामुळे दुकानांच्या मालकांनाच आलेल्या गिºहाइकांना धान्याच्या पिशव्या उचलून द्याव्या लागत आहे.
मालाची आवकजावक बंद
जीवनावश्यक म्हणून भाजीपाला, धान्य, कडधान्यांची वाहतूक सुरू राहील असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले असले तरी सध्या नाकाबंदीमुळे शहरात येणाºया व जाणाºया वाहनांवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी मालाची आवकजावक ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम आठ दिवसांनंतर दिसण्यास सुरुवात होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.