सारथीसाठी लालमहाल, तर मराठा आरक्षणासाठी लालकिल्ल्यावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 07:15 PM2020-10-15T19:15:34+5:302020-10-15T19:17:06+5:30
Maratha Reservation, kolhpaurnews सारथीच्या (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) स्वायत्तेसाठी पुण्यातील लालमहाल, तर आरक्षणासाठी दिल्लीतील लालकिल्ल्यावर धडक देण्याचा निर्धार कोल्हापुरात गुरुवारी सकल मराठा समाजाने व्यापक मेळाव्यात केला.
कोल्हापूर : सारथीच्या (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) स्वायत्तेसाठी पुण्यातील लालमहाल, तर आरक्षणासाठी दिल्लीतील लालकिल्ल्यावर धडक देण्याचा निर्धार कोल्हापुरात गुरुवारी सकल मराठा समाजाने व्यापक मेळाव्यात केला.
विविध आठ मागण्यांचे निवेदन सोमवारी (दि. १९) राज्य सरकारला देण्यात येईल. त्याबाबत सरकारकडून ठोस कार्यवाही झाली नाही, तर दि. २९ ऑक्टोबरला लालमहालमधील अभिवादन सभेत एकत्र येऊन लढ्याची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णयही घेण्यात आला.
येथील धैर्यप्रसाद हॉलमधील या व्यापक मेळाव्यास शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आवाडे प्रमुख उपस्थित होते. सारथीबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी आम्ही राज्य सरकारला दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला धोका होऊ नये म्हणून केंद्र सरकारने कायद्यामध्ये बदल करावा, अन्यथा फेब्रुवारी-मार्चमध्ये अधिवेशन काळात सर्व खासदारांना घेऊन दिल्लीतील लालकिल्ल्यावर आंदोलन केले जाईल.
कायदेशीररीत्या मराठा आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनाची धग कायम ठेवण्याचा निर्धार या मेळाव्यात केला असल्याचे सकल मराठा समाजाचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी सांगितले. या मेळाव्यास कोल्हापूर, सांगली, मिरज येथील मराठा समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.