मालवाहतुकीसाठी लालपरीचा हातभार ठरतोय मोलाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:13 PM2020-06-01T17:13:42+5:302020-06-01T17:17:30+5:30
विशेष म्हणजे मालवाहतुकीचा दरही इतर खासगी मालवाहतूकदारांच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे. तर लांजा येथून आठ टन तांदूळही कोल्हापुरातील गडहिंग्लजसाठी आरक्षित झाला आहे
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य कोणत्याही प्रकारची मालवाहतूक अद्यापही सुरू नाही. छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे मालाअभावी व्यवसाय धोक्यात येऊ नयेत. याकरिता एस. टी. महामंडळाने मालवाहतुकीचा सर्वोत्तम पर्याय आणला आहे. त्याचा फायदा घेत रविवारी लांजा येथे आठ टन खताची पाठवणी करण्यात आली.
गेल्या सत्तर दिवसांहून अधिक काळ राज्यात विविध ठिकाणच्या कोरोनाच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यात ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांना जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतुकीस, तर राज्याच्या विविध सीमांपर्यतच्या कोणत्याही जिल्ह्यात एस.टी.च्या लालपरीने मालवाहतुकीसही परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने रविवारी लांजा (रत्नागिरी) येथे ८ टन खताची पाठवणी केली. विशेष म्हणजे मालवाहतुकीचा दरही इतर खासगी मालवाहतूकदारांच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे. तर लांजा येथून आठ टन तांदूळही कोल्हापुरातील गडहिंग्लजसाठी आरक्षित झाला आहे. विशेष म्हणजे ३४ रुपये इतका प्रती किलोमीटरचा खर्च महामंडळास मालवाहतूक करताना येत आहे. त्यावर जो दर मिळेल त्याप्रमाणे मालवाहतूक केली जात आहे. त्यातून व्यापारी, उद्योजक, शेतकऱ्यांना अन्य मालवाहतूकदारांच्या तुलनेत किमान २ ते ३ हजार रुपयांपर्यंतचा फायदा होत आहे. वाढता प्रतिसाद पाहून महामंडळानेही सर्व एस.टी. बसेस परिपूर्ण केल्या आहेत. मालवाहतुकीपूर्वी व नंतरही बसेस सॅनिटायझर केल्या जात आहेत. तर चालकही मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आहेत.
प्रवासी वाहतुकीसह वाढता प्रतिसाद आहे. गेल्या नऊ दिवसांत १५०० हून अधिक प्रवाशांनी जिल्ह्यांतर्गत प्रवास केला आहे. यात इचलकरंजी, गारगोटी, गडहिंग्लज, हुपरी, राधानगरी, जयसिंगपूर, मलकापूर, या ठिकाणी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर चंदगड, शाहूवाडी, आजरा या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे वाहतूक अत्यल्प करण्यात आली आहे.
- खासगी ट्रान्सपोर्टच्या तुलनेत एस.टी.च्या लालपरीने मालवाहतूक केल्यास नागरिकांना किमान दोन हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे.
- मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांत कोल्हापुरातून लालपरीने मालवाहतूक करता येत आहे.
- जिल्ह्यांतर्गत ५० कि.मी. पर्यंत मालाच्या प्रकारानुसार मालवाहतूक प्रति कि.मी.चे दर फ्लेक्झी करण्यात आले आहेत.
अत्यंत माफक दरात व महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यांत महामंडळाच्या बसेसमधून मालवाहतुकीची २४ बाय ७ अशा पद्धतीने सेवा दिली जात आहे. सोबत जिल्हांतर्गत प्रवासी
वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा.
- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कोल्हापूर