कोल्हापूर-सांगली चौपदरीकरण: भूसंपादनाचा मार्ग झाला मोकळा, लवकरच कामाला सुरुवात होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 01:36 PM2023-09-26T13:36:50+5:302023-09-26T13:37:14+5:30
शिरोली सांगली हा रस्ता खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीवरून केंद्रीय दळणवळण व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडे वर्ग करून घेतला
कोल्हापूर : कोल्हापूर-शिरोली-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाल्याने लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. शिरोली सांगली हा रस्ता खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीवरून केंद्रीय दळणवळण व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडे वर्ग करून घेतला आहे.
या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ हा नंबर देण्यात आला आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्यानंतर चौपदरीकरणाच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करून त्याचा डीपीआर बनवण्यात आला आहे. या डीपीआरनुसार रस्त्यासाठी काही प्रमाणात भूसंपादन करावे लागत होते.
भूसंपादनाच्या अंतिम मंजुरीसाठीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे लक्षात घेऊन खासदार माने यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी दिल्लीत असताना नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संतोष कुमार यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भूसंपादनाच्या प्रलंबित प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन कामास सुरुवात करावी, अशी लेखी मागणी केली.
या मागणीची दखल घेत नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने भूसंपादनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या शिरोली सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.