मंदिर परिसरातील भूसंपादन अनावश्यक
By admin | Published: April 16, 2015 11:55 PM2015-04-16T23:55:12+5:302015-04-17T00:05:54+5:30
संघटनेचे महापौरांना निवेदन : अंबाबाई मंदिर विकास आराखडा फसवा असल्याचा आरोप
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा हा २००९ साली मांडलेल्या आराखड्याप्रमाणेच आहे. मंदिर परिसरातील जागा संपादित केल्याने ३०० कुटुंबे व ४०० व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे. मोठी शाळाही स्थलांतरित करावी लागणार असून, महाद्वार ही व्यापारी गल्ली असणारी ओळख पुसली जाणार आहे. गरज नसताना या परिसरातील भूसंपादन करण्याचा घाट घातला जात आहे. तरी सोमवारच्या सभेपुढे येणारा अंबाबाई मंदिर विकास आराखडा मंजूर करू नये, अशी मागणी श्री अंबाबाई मंदिर परिसर रहिवासी व व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे महापौर तृप्ती माळवी यांच्याकडे गुरुवारी केली.
चार वर्षांपूर्वी केलेला आराखडाच पुन्हा दुसऱ्या नावाने सादर केलेला आहे. यावेळी आराखड्याविरोधात जनआंदोलन उभे राहिले होते. परिसरातील सर्वच घटकांचा मंदिराशी असणाऱ्या संबंधाचा या आराखड्यात अभ्यास झालेला नाही. व्यापाऱ्यांना विस्थापित केल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. विद्यापीठ हायस्कूल हलविल्यास त्याचा दोन हजार विद्यार्थ्यांना फटका बसेल. नवरात्री काळात दररोज सुमारे एक लाख भाविक देवीचे दर्शन घेतात. मंदिराच्या पूर्व बाजूस असलेली जागा या सर्व भाविकांना सामावून घेण्यास पुरेशी आहे. तरीही कोट्यवधी रुपये खर्चून ७५० भाविकांसाठी सभामंडप व बगीचा करणे, ही निव्वळ उधळपट्टी ठरणार आहे. मंदिर परिसरातील दाटी कमी करण्यासाठी फेरीवाल्यांचे व्यवस्थित नियोजन करावे, अतिक्रमणाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)