भू-विकास बॅंकेच्या ओटीएस योजनेला मार्चअखेरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:23 AM2021-01-08T05:23:48+5:302021-01-08T05:23:48+5:30
कोल्हापूर : भू-विकास बँकेच्या थकीत कर्जदारांना ७० ते ७५ टक्के सवलत देणारी ओटीस अर्थात एकरकमी कर्जपरतफेड योजनेला ३१ मार्चअखेरपर्यंत ...
कोल्हापूर : भू-विकास बँकेच्या थकीत कर्जदारांना ७० ते ७५ टक्के सवलत देणारी ओटीस अर्थात एकरकमी कर्जपरतफेड योजनेला ३१ मार्चअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा लाभा घ्यावा, असे आवाहन अवसायक व जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे.
भू-विकास बॅंक थकीत कर्जामुळे सध्या अवसायनात गेली आहे. पण ती थकीत देणी कर्जदारांनी भागवावीत म्हणून २००७ पासून राज्य शासनाने ओटीएस योजना राबवली आहे. त्याचे परिणामही चांगले दिसल्याने सातत्याने मुदतवाढ दिली गेली. ३१ मार्च २०१९ला शेवटची मुदत संपली होती. त्यानंतर मुदतवाढ द्यावी अशी सातत्याने मागणी होत होती, त्याकडे दुर्लक्ष होत होते.
अखेर २० ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या शासन निर्णयानुसार ३१ मार्च २०२१ पर्यंत ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तशा सूचनाही सहकार विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्जदारांवरचा थकबाकीदार हा शिक्का पुसण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. एकूण थकबाकीपैकी ७० ते ७५ टक्के सवलत मिळते. केवळ २५ ते ३० टक्केच रक्कम भरून कर्जमुक्त होत येते. ही संधी पुन्हा एकदा मिळाल्याने भू-विकास बॅंकेच्या थकबाकीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.