Kolhapur: आजरा एमआयडीसीसाठीची जमीन महसूल विभागाकडे, उद्योग विभागाला हस्तांतरित होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 15:31 IST2025-01-08T15:31:40+5:302025-01-08T15:31:54+5:30
कोल्हापूर : आजरा एमआयडीसीच्या विस्तारासाठी आवश्यक असणारी १७.७२ हेक्टर आर जमीन महसूल विभागाकडे वर्ग करण्यास कृषी व पशुसंवर्धन विभागाने ...

Kolhapur: आजरा एमआयडीसीसाठीची जमीन महसूल विभागाकडे, उद्योग विभागाला हस्तांतरित होणार
कोल्हापूर : आजरा एमआयडीसीच्या विस्तारासाठी आवश्यक असणारी १७.७२ हेक्टर आर जमीन महसूल विभागाकडे वर्ग करण्यास कृषी व पशुसंवर्धन विभागाने मान्यता दिली आहे. याबाबत ६ जानेवारी २०२५ रोजी शासन आदेश काढण्यात आला आहे. याआधी ही जमीन थेट ऊर्जा व कामगार विभागाकडे वर्ग करण्याचा शासन आदेश काढण्यात आला होता. तो आता रद्द करण्यात आला असून, महसूल विभागाकडून उद्योग विभागाला ही जमीन आता हस्तांतरित करण्यात येणार आहे.
आजरा एमआयडीसीचा विस्तार करण्यासाठी आजरा येथील ७.०१ हेक्टर व पारेवाडी येथील १०.७३ हेक्टर इतकी जमीन आवश्यक आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि थेट मुख्यमंत्र्यांनीच या प्रस्तावाला मान्यता दिल्याने ही जमीन थेट उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडे हस्तांतरित करण्याचा शासन आदेश निवडणुकीआधी काढण्यात आला. परंतु, ८ सप्टेंबर २००८ च्या शासन परिपत्रकानुसार महसूल व वन विभागाच्या परवानगीशिवाय जमीन हस्तांतरणावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.
तसेच शासकीय विभागांना प्रदान केलेल्या शासकीय जमिनीसंदर्भात अशा जमिनींची शासकीय विभागांना आवश्यकता नसल्यास त्या विभागाने अशा जमिनी महसूल विभागाच्या सहमतीने महसूल विभागाकडे प्रत्यार्पित करणे आवश्यक आहे. त्यानुसार या नव्या शासन आदेशानुसार आता ही जमीन महसूल विभागाकडे प्रत्यार्पित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानंतर आता हीच जागा एमआयडीसीच्या विस्तारासाठी उद्योग विभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर मग या ठिकाणी एमआयडीसी विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.