पन्हाळा तालुक्यातील नावलीत जमिन खचली, सहा कुटूंबांचे स्थलांतर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 03:50 PM2019-07-10T15:50:04+5:302019-07-10T15:55:39+5:30
पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन होत असल्याच्या तक्रारीनंतर आता पन्हाळा तालुक्यातील नावलीपैकी जांभळेवाडी या गावातील जमिनी खचत असल्यामुळे या गावातील सहा कुटूंबातील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. या कुटूंबांचे स्थलांतर करुन त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्यात याव्यात असे आदेश पन्हाळ्याचे तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोल्हापूर : पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन होत असल्याच्या तक्रारीनंतर आता पन्हाळा तालुक्यातील नावलीपैकी जांभळेवाडी या गावातील जमिनी खचत असल्यामुळे या गावातील सहा कुटूंबातील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. या कुटूंबांचे स्थलांतर करुन त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्यात याव्यात असे आदेश पन्हाळ्याचे तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पन्हाळा तालुक्यातील नावलीपैकी जांभळेवाडी येथील जमिनीचा काही भाग खचलेला असल्यामुळे गावातील गट नंबर ३२५, ३२६, ३२७ आणि ३३८ या जमिनीमधील रहिवाशी असणाऱ्या कुटूंबांस धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात जांभळेवाडी येथील ग्रामस्थांनी तहसिलदारांकडे सूचना दिली होती. तहसिलदारांनी तत्काळ संबंधित तलाठ्यांना यासंदर्भात चौकशी करुन अहवाल देण्यास सांगितले होते. तलाठ्यांनी ८ जुलै रोजी प्रत्यक्ष पाहणी करुन या जमिनी खचत असल्याचा अहवाल तहसिलदारांकडे दिल्यानंतर या कुटूंबांचे स्थलांतर करण्याबाबतच्या सूचना पन्हाळा गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मौजे जांभळेवाडी येथे सर्जेराव आप्पाजी जांभळे, बाळू गणपती जांभळे, शिवाजी मारुती जांभळे, सुभाष मारुती जांभळे, पांडुरंग आप्पा जांभळे, आणि नामदेव आनंदा जाधव यांची घरे आहेत. अतिवृष्टीमुळे या जमिनी खचून या कुटूंबांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित कुटूुबांतील व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे आणि त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात आणि तसा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश पन्हाळ्याचे तहसिलदारांनी पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.