शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी, सर्व्हेला येणाऱ्यांना ठोकून काढा - राजू शेट्टी
By भीमगोंड देसाई | Published: April 4, 2024 06:19 PM2024-04-04T18:19:59+5:302024-04-04T18:20:20+5:30
गुळगुळीत भूमिकेपेक्षा आक्रमक व्हा, लढला तरच शेती वाचणार
कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाप्रश्नी गुळगुळीत भूमिका घेवून चालणार नाही. आक्रमक होवून लढलो तर जमिनी वाचणार आहेत. महामार्गासाठी जमीन मोजणी आणि सर्व्हेसाठी येणाऱ्यांना ठोकून काढा, असा आदेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
या लढ्याचे नेतृत्व कोणीही करा मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवा. आमच्यावर तुडवायची, बडवायची जबाबदारी दिली तरी आम्ही ती पेलू. अस्वलाला केसाचा हिशोब नसतो. त्याप्रमाणे आता असलेल्या आमच्या कोर्ट, केसीसीमध्ये पुन्हा वाढ होतील. त्याचीही आमची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे आयोजित शेतकरी निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजय घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी खासदार शेट्टी म्हणाले, शक्तीपीठ महामार्गामुळे केवळ शेतकरीच उध्दवस्त होणर नाही तर नवीन होणारे पूल, बोगद्यामुळे कोल्हापूर, सांगलीसह अनेक गावांना पुराचा धोका निर्माण होणार आहे. म्हणून शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढ्यात शेतकऱ्यांसोबत सामान्य जनतेलाही सहभागी करून घ्यावे लागेल.
आमदार पाटील म्हणाले, शक्तीपीठ महामार्गासाठी ८६ हजार रूपये खर्च करून शेतकऱ्यांना उध्दवस्त करण्याऐवजी हाच निधी पर्यटनस्थळाच्या विकासासाठी द्यावा. ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी हा रस्ता करण्यात येणार आहे. म्हणून हा महामार्ग रद्द होईपर्यंत एकजुठीने लढावे लागणार आहे. या महामार्गाला काँग्रेस पक्षाचाही तीव्र विरोध असेल.
डॉ. पाटणकर म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाच्या दोन्ही बाजूला कॉरीडॉर होणार आहे. त्यामुळे आता सर्व्हे करण्यात येण्यापेक्षा अधिकची जमीन संपादीत होणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखो शेतकऱ्यांचा मोर्चा काढू.
माजी आमदार घाटगे म्हणाले, नागपुरातून लवकर दारू पिण्यासाठी गोव्याला जाण्यासाठी हा महामार्ग करण्यात येणार आहे. यातून विकास होणार नाही.
यावेळी माजी आमदार संपत पवार, गिरीष फोंडे, विक्रांत पाटील, महादेव धनवडे, हिरालाल परदेशी, अंबरीश घाटगे, मच्छिंद्र मुगडे यांची भाषणे झाली. राजेंद्र गड्यान्नावर, संपत देसाई, बाबुराव कदम, प्रसाद खोबरे आदी उपस्थित होते.