पीक विमा उतरा, भरपाई मिळवा
By admin | Published: January 5, 2015 12:16 AM2015-01-05T00:16:05+5:302015-01-05T00:43:29+5:30
शासन उचलणार वाटा : हवामान बदलामुळे नुकसान झाल्यास दिलासा; कृषी खात्याशी संपर्काचे आवाहन
भीमगोंडा पाटील -कोल्हापूर -शासनाच्या कृषी विभागाने हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू केली आहे. काजू, आंबा, केळी, द्राक्ष उत्पादकांना या विम्याचा फायदा होणार आहे. शासनाने विमा हप्त्याचा मोठा वाटा उचलला आहे. नुकसान भरपाई खासगी कंपन्या देणार आहेत. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अधिक माहिती घेऊन १५ जानेवारीपर्यंत विमा उतरविणे आवश्यक आहे.
सन २०१३ वर्षापासून ही योजना राबविली जात आहे. ३१ डिसेंबर २०१४ रोजी शासनाने नवीन आदेश काढून गारपिटीने यंदा नुकसान होणाऱ्या पीक नुकसानीलाही भरपाई द्यावी, अशी सूचना दिली आहे. यामुळे आता हवामान बदलाने व गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाई देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी टाटा ए. आय.जी. इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी सोपविली आहे.
काजू, द्राक्ष, केळी, आंबा आदी फळझाडांचा विम्यासाठी समावेश आहे. एक हेक्टर आंबा, केळीसाठी ११ हजार रुपयांचा विमा हप्ता आहे. यांपैकी दोन हजार रुपये शेतकऱ्यास भरावे लागणार आहे. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य शासन भरणार आहे. या बदल्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीस ३३ हजार ३३३ रुपये मिळणार आहे. काजूसाठी ८ हजार २५० रुपयांचा विमा हप्ता आहे. यातील १५०० रुपये शेतकऱ्यास भरावे लागणार आहेत. भरपाई २५ हजार मिळणार आहे. द्राक्षांसाठी १६ हजार ५०० रुपयांचा विमा हप्ता आहे. शेतकऱ्यास तीन हजार रुपये भरावे लागणार आहेत. भरपाईपोटी ५० हजार रुपये मिळणार आहेत.
अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीस विमा हप्ता वरीलप्रमाणेच आहे. मात्र, भरपाई रक्कम विविध टप्प्यांत वेगवेगळी आहे. १६ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबरअखेरसाठी भरपाई हेक्टरी २ ते २० हजारापर्यंत मिळणार आहे. ८ ते ३० नोव्हेंबरअखेर झालेल्या नुकसान भरपाईपोटी ५ ते ९० हजार, तर १ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१५ अखेर ५ ते ४० हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळणार आहे. सर्व टप्प्यांची अधिकाधिक दीड लाख रुपये भरपाई विमा कंपनीकडून मिळणार आहे.
वाहन विमा कंपन्या पिकांसाठीही...
वाहन अपघातानंतर नुकसानभरपाई देणाऱ्या टाटा ए.आय., जी. इन्शुरन्स कंपनी, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, एच.डी.एफ.सी. अॅर्गो, रिलायन्स इन्शुरन्स, आदी कंपन्यांवर आता पीक नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सोपविली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी टाटा ए.आय.जी. इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी सोपविली आहे.
हवामान आधारित पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली आहे. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अधिक माहिती घ्यावी. कृषी विभागातर्फेही जागृती केली जात आहे.
- मोहन आटोळे, जिल्हा कृषी अधीक्षक