लँडमाफियांकडून मुंबईच्या व्यापाऱ्यांना बेदम मारहाण
By admin | Published: February 21, 2016 01:22 AM2016-02-21T01:22:15+5:302016-02-21T01:23:29+5:30
रंकाळ्यातील घटना : साठ हजार काढून घेतले
कोल्हापूर : जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी आलेल्या मुंबईच्या दोघा व्यापाऱ्यांना रंकाळा येथील हॉटेल शालिनी पॅलेससमोर कोल्हापुरातील लॅँडमाफियांनी बेदम मारहाण केली. कपिलेश्वर विजयकुमार जोशी (वय ३४), धर्मपुरी नारायण सिद्राम (४२, दोघे रा. वरळी, मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना अर्धनग्न अवस्थेत सोडून त्यांच्याकडील एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेत खात्यावरील साठ हजार रुपये काढून घेतले. या दोघांनाही मित्रांनी सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. ही घटना शुक्रवारी (दि. १९) मध्यरात्री घडली.
हाफिज नावाच्या लॅँडमाफियासह अन्य चौघांनी मारहाण केल्याची माहिती जखमी जोशी यांनी जुना राजवाडा पोलिसांना दिली आहे; परंतु त्यांनी या लॅँडमाफियांच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत फिर्याद न दिल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता. व्यापारी जोशी यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता.
याबाबत अधिक माहिती अशी, कुडाळ येथील हाफिज (पूर्ण नाव माहीत नाही) हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. मुंबईतील व्यापारी कपिलेश्वर जोशी व धर्मपुरी सिद्राम या दोघांना रंकाळा परिसरात व कुडाळ येथे जमीन खरेदी करायची होती. हाफिज याच्या मध्यस्थीने त्यांनी स्थानिक लॅँडमाफियांशी संपर्क साधला. त्यांनी या
दोघांना जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी कोल्हापूरला येण्यास सांगितले.
त्यानुसार दोघेजण इनोव्हा कारमधून शुक्रवारी रात्री कोल्हापुरात आले. स्थानिक मित्र अभय जगताप यांना सोबत घेऊन त्यांनी हाफिज याच्याशी संपर्क साधला असता त्याने त्यांना रंकाळा येथील
शालिनी पॅलेस हॉटेलसमोर येण्यास सांगितले.
मध्यरात्री बाराच्या सुमारास ते त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी चौघेजण थांबून होते. त्यांनी जमिनीसंदर्भात चर्चा केली. यावेळी लॅँडमाफियांनी तुम्हाला जमीन दाखविली आहे, असे सांगून अॅडव्हान्स पैसे देण्याची मागणी केली. ‘जमीन न पाहता दाखविली कशी म्हणता?’ अशी विचारणा जोशी यांनी केली. त्यावरून त्या चौघांनी त्यांच्याशी वादावादी करीत त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना अर्धनग्न केले. त्यानंतर जोशी यांच्याकडील एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेत त्यावरून साठ हजार रुपये काढून घेत पोबारा केला. त्यानंतर मित्र जगताप यांनी या दोघांना ‘सीपीआर’मध्ये उपचारासाठी दाखल केले.
त्यांच्या अंगावर मारहाणीचे वळ उठले होते.
या घटनेची माहिती
समजताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हवालदार शकुंतला मोहळकर ह्या ‘सीपीआर’मध्ये आल्या. त्यांनी जखमी कपिलेश्वर जोशी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आता आपली मानसिक स्थिती बरोबर नाही; शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देईन असे सांगितले. तसा लेखी जबाब घेऊन त्या निघून आल्या.
दरम्यान, शनिवारी
दिवसभर जखमी दोघेही
व्यापारी पोलीस ठाण्याकडे फिरकलेच नाहीत. पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी तपास अधिकाऱ्यांकडे याप्रकरणी चौकशी केली. व्यापारी व लॅँडमाफिया आपापसांत प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. (प्रतिनिधी)