धामणी खोऱ्यात भूस्खलन, ठोस उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:14+5:302021-08-14T04:30:14+5:30

म्हसुर्ली: यावर्षी ढगफुटीसदृश पाऊस झाला असला तरी गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने निसर्गावरील मानवी हस्तक्षेप वाढत असल्यानेच या ...

Landslides in Dhamni valley, need for concrete measures | धामणी खोऱ्यात भूस्खलन, ठोस उपाययोजनांची गरज

धामणी खोऱ्यात भूस्खलन, ठोस उपाययोजनांची गरज

Next

म्हसुर्ली: यावर्षी ढगफुटीसदृश पाऊस झाला असला तरी गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने निसर्गावरील मानवी हस्तक्षेप वाढत असल्यानेच या परिसरातील म्हासुर्ली, कोनोली, गवशी राई, कंदलगाव, चौके,मानबेट(ता. राधानगरी); पनोरे, वेतवडे, अंबर्डे, हरपवडे, पणुत्रे(ता पन्हाळा ) याचबरोबर गगनबावडा तालुक्यातील कडवे, बावेली, जर्गी, अंदुर डॅम परिसर, धुंदवडे, खेरीवडे, शेळोशी आदी गावांच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या असून भूस्खलन होऊन शेकडो एकर सुपीक जमीन नापीक झाली आहे. यातील पिकेही गाडून गेली आहेत. या गावांपैकी कोनोली -कुपले वाडी, पखाले वाडी येथील डोंगरांना मोठ्या भेगा पडल्यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण झाला असून आतापर्यंत दोघांना जीव गमवावा लागला आहे. जिथे जिथे अशा घटना घडल्या आहेत त्या त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या कारणाने मानवी हस्तक्षेप झाल्याचे दिसून येते.

या परिसरातील अनेक गावांच्या शेजारी असणाऱ्या डोंगरांना मोठमोठ्या भेगा गेल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे बोडके डोंगरावर वृक्षारोपण करणे पडलेल्या भेगा बुजविणे चराऊ कुरणांची संख्या वाढविणे याचबरोबर या डोंगरांचे परीक्षण करून भूगर्भाचा अभ्यास करून नागरिकांना भयमुक्त करणे गरजेचे बनले आहे.

या परिसरात भूस्खलनासारखे प्रकार पहिल्यांदाच घडल्यामुळे भीतीची टांगती तलवार असल्याने कोनोलीपैकी कुपले वाडी, पखालेवाडी येथील नागरिकांची पुनर्वसनाच्या मागणीसह परिसरातील डोंगररांगांचे परीक्षण करून दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

.........

कोट...

ढगफुटीसदृश पावसाने डोंगर खचून येथील दोन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नसली तरी येथील नागरी वस्ती शेजारील डोंगरांना मोठ्या भेगा गेल्यामुळे येथील नागरिक मरण उशाला घेऊन वावरत आहेत. संबंधित यंत्रणेने डोंगरांचे परीक्षण करून आमच्या पुनर्वसनाचा विषय मार्गी लावावा.

====== भैरू कुपले, रहिवासी, कुप- लेवाडी- कोनोली (ता. राधानगरी)

भूस्खलनामुळे डोंगराचा मोठा भाग माझ्या शेतात येऊन मलब्याचा सुमारे १० ते १५ फूट उंचीचा थर शेतात साचला आहे. पिकाबरोबर शेतही गायब झाले आहे शासनाचे नुकसान भरपाईची रक्कम फारच तोकडी आहे.

====दगडू फाले, शेतकरी, म्हासुर्ली - बाजारीवाडा

Web Title: Landslides in Dhamni valley, need for concrete measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.